Abhay Yojana Pudhari
वर्धा

Mahavitaran Abhay Yojana | महावितरणच्या 'अभय योजने'साठी वर्धा जिल्ह्यातील 25 हजार ग्राहक पात्र

कायमस्वरूपी व तात्पुरता वीजपुरवठा खंडित असलेल्या उच्चदाब आणि लघुदाब वर्गवारीतील ग्राहकांना ही योजना लागू

पुढारी वृत्तसेवा

MSEDCL Abhay Scheme

वर्धा: वीज बिल भरता न आल्यामुळे किंवा इतर कारणांमुळे वीजपुरवठा खंडित झालेल्या वर्धा जिल्ह्यातील ग्राहकांसाठी अभय योजना 2026-27 लागू करण्यात आली आहे. हजारो घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक वीज ग्राहकांसाठी महावितरणतर्फे कायमस्वरूपी व तात्पुरता वीजपुरवठा खंडित असलेल्या उच्चदाब आणि लघुदाब वर्गवारीतील ग्राहकांना ही योजना लागू आहे. या योजनेमध्ये वर्धा जिल्ह्यातील तब्बल 25 हजार 902 वीज ग्राहक पात्र ठरले आहेत.

या योजनेत ग्राहकांच्या थकबाकीमधील संपूर्ण व्याजाची आणि विलंब आकाराची रक्कम 100 टक्के माफ करण्यात येणार आहे. ग्राहकांना केवळ मूळ रक्कम भरण्याची मुभा मिळणार आहे. ही मूळ थकबाकी एकाच वेळी किंवा हप्त्यांनी भरण्याची सुविधा महावितरणने उपलब्ध करून दिली आहे. योजना सुरू झाल्यापासून 15 डिसेंबरपर्यंत मूळ थकबाकीचा एकरकमी भरणा करणाऱ्या ग्राहकांसाठी 'अर्ली बर्ड रिबेट'ची विशेष सवलत जाहीर करण्यात आली आहे. याअंतर्गत लघुदाब घरगुती व व्यावसायिक ग्राहकांची वीजजोडणी 3 वर्षांपर्यंत कायमस्वरूपी खंडित असल्यास 10 टक्के, तर 3 वर्षांपेक्षा अधिक कालावधीपासून कायमस्वरूपी खंडित असल्यास तब्बल 20 टक्के सवलत मिळत आहे. तसेच, लघुदाब घरगुती व व्यावसायिक वर्गवारी वगळून इतर सर्व लघु व उच्चदाब ग्राहकांना अनुक्रमे 10 टक्के व 15 टक्के सूट दिली जात आहे.

ग्राहकांच्या आर्थिक सुविधेचा विचार करून, लघुदाब ग्राहकांना 50 टक्के डाऊन पेमेंट भरून उर्वरित रकमेसाठी 6 समान व्याजमुक्त मासिक हप्त्यांची सुविधा देण्यात आली आहे. तर उच्चदाब ग्राहकांना त्यांच्या थकबाकीनुसार 3 ते 6 व्याजमुक्त हप्त्यांचा लाभ घेता येणार आहे. मंजूर भार 20 किलोवॉटपर्यंत असलेल्या ज्या ग्राहकांनी पुनर्जोडणीच्या वेळी 'प्रीपेड स्मार्ट मीटर'चा पर्याय निवडला आहे, त्यांना मूळ थकबाकीमध्ये अतिरिक्त 5 टक्के सवलत दिली जात आहे. या योजनेत सहभागी होणाऱ्या ग्राहकांसाठी पुनर्जोडणी शुल्क आणि लघुदाब ग्राहकांसाठी सर्व्हिस कनेक्शन शुल्क पूर्णपणे माफ करण्यात आले आहे.

31 मार्च 2026 पर्यंत कृषी आणि सार्वजनिक नळपाणी पुरवठा योजना वगळून इतर सर्व घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक व इतर कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित असलेल्या वर्धा जिल्ह्यातील 25 उच्चदाब आणि 25 हजार 877 लघुदाब अशा 25 हजार 902 ग्राहकांकडे सुमारे 19 कोटी 5 लाख 31 हजार 911 रुपयांची एकूण थकबाकी आहे. यातील तब्बल 1 कोटी 44 लाख 95 हजार 801 रुपयांचे व्याज व विलंब आकार या योजनेमुळे पूर्णपणे माफ होणार आहेत.

‘अभय योजना 2026-17' साठी अर्जाची प्रक्रिया अत्यंत सुलभ, पारदर्शक आणि ऑनलाइन ठेवण्यात आली आहे. वीज पुरवठा पूर्ववत करून घेण्यासाठी आणि आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी जिल्ह्यातील पात्र ग्राहकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणच्या वर्धा मंडळाच्या अधीक्षक अभियंता स्मिता पारखी यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT