वर्धा : सिलिंडरचा स्फोट होऊन शेतकऱ्याचे घर जळून खाक झाले. या दुर्घटनेत सुमारे आठ लाखाचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. ही घटना कारंजा (घाडगे) तालुक्यातील नारा येथे मंगळवारी (दि.१) सायंकाळी सहाच्या सुमारास घडली.
नारा येथील नत्थुजी किसनाजी खवशी (वय ६५) व कुटुंबीय घरी मंगळवारी (दि.१) घरी होते. यावेळी सायंकाळी सहाच्या दरम्यान स्वयंपाक सुरू असताना अचानक गॅसचा भडका उडाला. प्रसंगावधान राखत घरातील सर्वजण घराबाहेर पडले. त्यानंतर सिलेंडरचा स्फोट होऊन संपूर्ण घर बेचिराख झाले. या घटनेत सुदैवाने जीवितहानी झाली नाही. मात्र खवशी यांचे जवळपास आठ लाखाचे नुकसान झाले. घटनास्थळी प्रशासनातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी भेट दिली.