वर्धा, पुढारी वृत्तसेवा : अनियंत्रित कारला झालेल्या अपघातात दोन जण गंभीर तर दोन जण किरकोळ जखमी झाले. ही घटना वर्धा - आर्वी मार्गावरील तळेगाव (रघुजी) ते खरांगणा (मोरांगणा) दरम्यान आज (दि. १५) घडली. जखमींना तातडीने रुग्णवाहिकच्या मदतीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
सावद (हेटी) येथील चार जण आर्वीकडून (एम एच 32 ए एस 1251) कारने येत होते. वर्धा - आर्वी मार्गावर तळेगाव (रघुजी) ते खरांगणा (मोरांगणा) दरम्यान चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले. यावेळी कार एका झाडाला लागून रस्त्याच्या कडेला उलटली. या अपघातात श्रावण नेहारे (वय ६४), नत्थुजी परतेकी (वय ६४) हे गंभीर जखमी झालेत. अपघातात चालक प्रकाशसिंह देवीसिंह बैस (वय ६५), कांता उईके (वय ६२) हे जखमी झालेत.
गंभीर जखमींना तातडीने रुग्णवाहिकेच्या मदतीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर खरांगणा (मोरांगणा) पोलिसांनी घटनास्थळ गाठून मदतकार्य केले. पोलीस उपनिरीक्षक गौरीशंकर आमटे, विठ्ठल केंद्रे, अमर करणे, मनीष वैद्य यांनी भेट देत पुढील कार्यवाही केली. पुढील तपास ठाणेदार सदाशिव ढाकणे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.