वर्धा; पुढारी वृत्तसेवा : शेतकर्यांची परिस्थिती अतिशय वाईट असून सोयाबीन, कापूस व इतर शेतीपिकांना भाव मिळत नसल्याने शेतकर्यांवर आत्महत्येची वेळ आली. गेल्या वर्षांचा पीकविमा व दुष्काळाची मदत अद्याप मिळालेली नाही. अशा परिस्थितीत सरकार मात्र बघ्याची भूमिका घेत आहे. त्यामुळे आपल्या हक्कासाठी शेतकर्यांनी संघटीत होवून लढा देणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन शेतकरी नेते रवीकांत तुपकर यांनी देवळी येथे शेतकरी संघर्ष यात्रेच्या समारोपीय एल्गार सभेत केले.
युवा संघर्ष मोर्चाच्या वतीने देवळी तालुक्यातील विविध गावांमध्ये मोटारसायकलने तीन दिवसीय शेतकरी संघर्ष यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. विविध प्रश्नांना घेऊन शेतकर्यांचा लढा उभारण्याच्या उद्देशाने देवळी येथून ही शेतकरी संघर्ष यात्रा काढण्यात आली. तिसर्या व शेवटच्या दिवशी ही यात्रा देवळी येथे पोहचली. या यात्रेमध्ये शेतकरी नेते रविकांत तुपकर स्वतः सहभागी झाले. सभास्थळी जल्लोषात स्वागत केले. शेतकर्यांनी रविकांत तुपकर यांना खांद्यावर उचलून सभा स्थळापर्यंत आणले. विदर्भातील सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकर्यांच्या हक्कासाठी मोठा लढा उभा करण्याचा मानस व्यक्त केला. कडाक्याच्या थंडीत सभेला शेतकर्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
युवा संघर्ष मोर्चाचे अध्यक्ष किरण ठाकरे यांनी विचार व्यक्त करत शेतकरी संघर्ष यात्रेचा उद्देश सांगितला. यावेळी मंचावर अविनाश काकडे, सुदाम पवार, प्रविण कात्रे, गौतम पोपटकर, समीर सारजे, लोमहर्ष बाळबुधे, स्वप्नील मदनकर, अॅड. मंगेश घुंगरूड, संदीप दिघीकर, मनोज नागपुरे, अशोक पवार, सागर दुधाने उपस्थित होते.
'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.
Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.