वर्धा : जिल्ह्यात अनेक प्राचीन मंदिरे असून या मंदिरांचा क वर्ग तीर्थस्थळामध्ये समावेश करण्यात आला आहे. या तीर्थस्थळांच्या विकासासाठी पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या पुढाकारातून ११.३० कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच क वर्ग तीर्थस्थळांसाठी एवढया मोठ्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.
जिल्ह्यात अनेक धार्मिक स्थळे आहेत. या स्थानांना प्राचीन इतिहास असून अनेकांचे श्रद्धास्थान आहे. दररोज शेकडो भक्त या स्थळांना भेट देतात. मात्र सुविधांची कमतरता असल्याने भक्तांना अडचणी येत होत्या. त्या लक्षात घेऊन या तीर्थस्थळांचा क वर्ग तीर्थस्थळामध्ये समावेश करण्यात येऊन जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधीची तरतूद करण्यात आली आहे. या तीर्थ स्थळांचा विकास झाल्यामुळे या गावातील अथवा परिसरातील स्थानिकांना रोजगाराच्या संधी मिळणार आहे. मंजूर निधीतून विविध विकासकामे हाती घेण्यात येणार आहेत. यामध्ये मंदिराचा विकास, जीर्णोद्धार, भक्त निवासाची उभारणी, रस्ते, पोहोच मार्गाची सुधारणा, पिण्याच्या पाण्याची सोय, सभागृह बांधकाम, शौचालय आणि स्नानगृहे, सौंदर्यीकरण, विद्युतीकरण, सौर ऊर्जा प्रकल्प आदींचा समावेश आहे. या विकास कामांमुळे भाविकांना आवश्यक सोयीसुविधा मिळतील आणि धार्मिक पर्यटनाला चालना मिळेल. तसेच, स्थानिक अर्थव्यवस्थेलाही त्याचा फायदा होईल. जिल्ह्याच्या धार्मिक आणि सांस्कृतिक वारशाचे जतन करण्यासाठी हा निधी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
जिल्ह्यातील ४० तीर्थ स्थळांचा विकास होणार आहे. यामध्ये सालोड हिरापूर येथील संत सदानंद महाराज देवस्थान, शंकर देवस्थान उमरी मेघे, श्री संत गजानन महाराज मंदिर म्हसाळा, संत अवचित महाराज देवस्थान पिपरी मेघे, श्री साई मंदिर आंजी मोठी, श्रीकृष्ण मंदिर आमला, नरसामाता देवस्थान आंजी मोठी, संत मानखोदी देवस्थान गोजी, भवानी मंदिर तळेगांव टा., श्री विठ्ठल मंदिर मदनी दिंदोडा, श्री विठ्ठल मंदिर घोराड, श्री लक्ष्मी माता देवस्थान टाकळी झडशी, हनुमान मंदिर इंझाळा, हनुमान मंदिर एकपाळा, श्री संत गाडगेबाबा नामसमाधी स्थळ दाभा, श्री संत पैकाजी महाराज देवस्थान सास्ताबाद सावली, श्री जानकेश्वर महाराज देवस्थान साती वरूड, संत आबाजी महाराज देवस्थान अल्लीपूर, विठ्ठल मंदिर अल्लीपूर, लक्ष्मी-नारायण मंदिर कापसी, हरिओम बाबा गौशाला लसनपूर, श्री विठ्ठल मंदिर कानकाटी, श्री विष्णू मंदिर नारायणपूर, श्री संत ब-हाणपुरे महाराज व राम मंदिर देवस्थान मांडगाव, श्री खाकीसाहेब देवस्थान सोरटा, श्री संत रघुनाथ महाराज देवस्थान गंगापूर टाकरखेडा, श्री विठ्ठल मंदिर रसुलाबाद, श्री हनुमान मंदिर मंदिर चिस्तूर, विठ्ठल मंदिर आनंदवाडी, श्री शंभुशेषबाबा देवस्थान खडकी, श्री संत सरस्वती महाराज देवस्थान परसोडा, श्री लक्ष्मी-नारायण मंदिर व हनुमान मंदिर साहूर, पीर चांद शहा अली दर्गाह गवंडी, श्री संत प्रेमनाथ महाराज देवस्थान आगरगांव, विठ्ठल मंदिर वायफळ, श्री श्याम धाम देवस्थान पिपरी मेघे, श्री दत्त मंदिर निमगांव या तीर्थस्थळांचा समावेश आहे.
जिल्ह्यात अनेक तीर्थस्थळे आहेत. दररोज भाविक दर्शनासाठी जातात. त्यांना चांगल्या सुविधा मिळाव्या यासाठी या स्थळांचा विकास करण्यात येत आहे. तीर्थस्थळांच्या सुविधा यापुढे देखील वाढविण्यात येईल. तीर्थस्थळामुळे गावाचे महत्व वाढणार असून स्थानिक विकासासोबतच अर्थकारणाला देखील बळकटी मिळणार आहे. तीर्थक्षेत्रांच्या विकासामुळे अध्यात्मिक पर्यटनाला चालना मिळेल.डॉ. पंकज भोयर, पालकमंत्री, वर्धा