वर्धा : एका अल्पवयीन मुलीच्या डोक्यावर अक्षता पडण्यापूर्वीच प्रशासनाने वेळीच हस्तक्षेप करत तिचा बालविवाह रोखला आहे. जिल्हा महिला व बाल विकास विभाग, पोलीस प्रशासन आणि चाईल्ड हेल्पलाईन यांच्या संयुक्त कारवाईमुळे हा प्रकार थांबविण्यात यश आले असून, या कारवाईचे परिसरात कौतुक होत आहे.
एका गावात अल्पवयीन बालिकेचा विवाह लावून दिला जात असल्याची गोपनीय माहिती चाईल्ड हेल्पलाईन आणि स्थानिक प्रशासनाला मिळाली होती. माहिती मिळताच जिल्हा बाल संरक्षण कक्ष, पोलीस विभाग आणि स्थानिक प्रशासनाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पथकाने मुलीच्या कुटुंबीयांना खरांगणा (मोरांगणा) पोलीस ठाण्यात पाचारण केले. तेथे ग्रामपंचायत अधिकारी तथा बालविवाह प्रतिबंधक अधिकारी संदीप खोडे यांनी पालकांकडून बालविवाह थांबविण्याबाबतचा रीतसर जबाबनामा लिहून घेतला.
विवाह रोखल्यानंतर चाईल्ड हेल्पलाईनचे प्रकल्प समन्वयक आशिष मोडक यांनी मुलीच्या कुटुंबीयांचे समुपदेशन केले. बालविवाहाचे शारीरिक, मानसिक दुष्परिणाम आणि 'बालविवाह प्रतिबंधक कायदा २००६' नुसार हा कसा गंभीर गुन्हा आहे, याची सविस्तर माहिती दिली. प्रशासनाच्या या समजावणीनंतर पालकांनी मुलीचा विवाह थांबविण्यास सहमती दर्शवली.
सध्या या बालिकेला बाल कल्याण समिती वर्धा समोर हजर करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, पुढील कार्यवाही समितीमार्फत केली जाणार आहे. मुलीच्या सुरक्षेला आणि शिक्षणाला प्राधान्य देण्याबाबत पालकांना मार्गदर्शन करण्यात आले आहे. ही मोहीम जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी तृप्ती चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा बाल संरक्षण अधिकारी महेश कामडी व त्यांच्या पथकाने यशस्वी केली.
बालविवाह हा गुन्हा आहे. अशा घटना आपल्या परिसरात घडत असल्याचे निदर्शनास आल्यास नागरिकांनी तात्काळ १०९८ (चाईल्ड हेल्पलाईन) या टोल फ्री क्रमांकावर माहिती द्यावी, जेणेकरून बालकांचे भवितव्य सुरक्षित राखता येईल.— तृप्ती चव्हाण, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, वर्धा.