वर्धा: जिल्ह्यातील धोत्रा ते अल्लीपूर मार्गावर कार आणि कंटेनरच्या अपघातात कारमधील तिघांचा मृत्यू झाला. या अपघातात एक जण गंभीर जखमी झाला असून जखमीला सावंगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. ४ नोव्हेंबर रोजी रात्रीच्या सुमारास हा अपघात घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये गौरव गावंडे (रा. अलमडोह) वैभव शिवणकर (रा. अल्लीपूर) विशांत वैद्य (रा. चानकी) या तिघांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले. अपघातात गंभीर जखमी झालेल्या भूषण वडनेरकर यास सावंगी येथील रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. फोटोग्राफीचा व्यवसाय करणारे गौरव गावंडे आणि विशांत वैद्य हे दोघे फोटोग्राफी ऑर्डर पूर्ण करून दोघेही परत येताना धोत्रा येथे आले. भूषण वडनेरकर व वैभव शिवणकर हे दोघे कारने धोत्रा येथे दोघांना आणण्यासाठी गेले होते. चारही जण परत येत असताना अल्लीपूर धोत्रा मार्गावर कार आणि कंटेनरचा अपघात घडला.
या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला. गंभीर जखमीस रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. याप्रकरणी अल्लीपूर पोलिसांनी कंटेनर चालकवारे गुन्हा दाखल केला. अपघाताची माहिती मिळताच अल्लीपूर पोलिसांनी घटनास्थळ गाठले. अपघातामुळे वाहतूक काही वेळ खोळंबली होती. अल्लीपूर पोलिसांनी अपघातस्थळी वाहतूक सुरळीत केली. पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे.