Maharashtra Farmer Loan Issues
वर्धा : शेतकरी आत्महत्या होऊ नयेत यासाठी सरकारकडून विविध योजना राबवल्या जात आहेत. शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध करून दिले जाते. योग्य वेळ आल्यावर कृषी कर्जमाफी दिली जाणार आहे. आमच्या जाहीरनाम्यात याचा समावेश आहे. त्यामुळे योग्य वेळ कधी येणार, ते आम्ही सांगू. सध्या ‘लाडकी बहीण’ योजना आणि २० हजार कोटींची वीजमाफी देण्यात आली आहे. पुढील पावलं उचलताना सगळ्या गोष्टींचा विचार केला जाईल, असे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (दि.२१) सांगितले.
अजित पवार वर्धा दौऱ्यावर असून आज त्यांनी जिल्हा नियोजनचा आणि पूरस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ते पुढे म्हणाले की, राजकारणात चढ-उतार येत असतात, लोकं येतात आणि जातात. परंतु आम्ही नेहमी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे आहोत, असे स्पष्ट करत उपमुख्यमंत्र्यांनी शेतकरी हिताचे अनेक निर्णय घेतल्याचे सांगितले .
आपल्या भाषणातील पूर्वीच्या वक्तव्याबाबत स्पष्टीकरण देताना त्यांनी म्हटले की, “मी मागे चुकीचा शब्द वापरला, त्याची किंमत मला १० वर्ष चुकवावी लागली. त्यामुळे आता प्रश्न विचारताना त्यावरच चर्चा करू नका. मी शेतकरी आहे, पाणी शिल्लक असलं तरच पिकाचं नियोजन होतं. यात मी काय चुकीचं बोललो?” असे त्यांनी उपस्थितांना प्रश्न केला.
दरम्यान, स्थानिक स्वराज संस्था निवडणुका डिसेंबर जानेवारी मध्ये होईल, तेव्हा नवीन प्रतिनिधी येईल. केंद्राच्या योजनांचा आढावा घेण्याचा अधिकार खासदारांना आहे, जिल्हा नियोजन समिती ही राज्य सरकारची आहे. महसूल बुडाला तरी चालेल पण वर्धेत दारू बंदी कायम राहील, सेवाग्राम आणि विनोबा भावे यांचा जिल्हा आहे. त्यामुळे आमच्या डोक्यात देखील दारू बंदी उठविण्याचा विचार नाही, असे पवार यांनी स्पष्ट केले.