वर्धा : पवनार आश्रमच्या भगिनी कालिंदीताई सरवटे यांचे सोमवारी (दि.७) पवनार येथील आचार्य विनोबा भावे आश्रमात निधन झाले. त्या ९४ वर्षाच्या होत्या. मंगळवारी (दि.८) सकाळी आश्रम परिसरात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
मूळच्या इंदोरच्या रहिवासी कालिंदी ताई ह्या भूदान पदयात्रेत सहभागी झाल्या होत्या. त्यानंतर त्या भूदान चळवळीत विनोबांच्या सोबत पदयात्रेत होत्या. विनोबांच्या भाषणांचे सर्व नोट्स त्या ठेवत होत्या. त्या नोट्स 'पत्रिका' या मासिकाकरिता त्या तयार करून ठेवत होत्या. २५ मार्च १९५९ ला आचार्य विनोबा भावे यांनी पवनार येथे ब्रह्मविद्यामंदिरची स्थापना केल्यानंतर त्या शेवटपर्यंत पवनार आश्रमातच राहिल्या. आश्रमातून प्रकाशित होणाऱ्या 'मैत्री' मासिकांच्या त्या दीर्घकाळ संपादिका होत्या. विनोबांच्या अनेक पुस्तकांचे त्यांनी संपादन केले.