विदर्भ

चंद्रपूर : तुकडोजी नागरी पतसंस्थेतील भ्रष्टाचार प्रकरणी माजी उपाध्यक्ष, व्यवस्थापकासह चौघांना अटक

रणजित गायकवाड

चंद्रपूर : पुढारी वृत्तसेवा : चंद्रपूर जिल्ह्यात चिमुर शहरातील राष्ट्रसंत तुकडोजी नागरी सह. पतसंस्थेमध्ये बनावट दस्ताऐवज तयार करून व दस्ताऐवजात फेरफार करून साडेसात कोटींची अफरातफर केल्याप्रकरणी संस्थेचे माजी उपाध्यक्ष, माजी व्यवस्थापकासह चौघांना शुक्रवारी (19 मे) अटक करण्यात आली. या कारवाईने एकच खळबळ उडाली आहे. माजी उपाध्यक्ष अरुण संभाजी मेहरकुरे, माजी व्यवस्थापक मारोती पेंदोर, माजी मुख्य लिपिक अमोल मेहरकुरे, अतुल मेहरकुरे असे आरोपींचे नाव आहे. अन्याय निवारण समितीच्या आंदोलनानंतर ही कारवाई झाली.

चिमूर येथील राष्ट्रसंत तुकडोजी नागरी सहकारी पतसंस्था (र.नं. 803) मध्ये संस्थेचे तत्कालीन माजी उपाध्यक्ष, माजी व्यवस्थापक व अन्य सात जणांनी 1 एप्रिल 2012 ते 31 मार्च 2021 कालावधीत पदावर असताना गैरव्यवहार केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. पतसंस्थेच्या आर्थिक व्यवहाराचे संगणकीकरण एप्रिल 2012 पासून करण्यात आले होते. कॅशियरला कॉम्प्युटर सॉफ्टवेअर न देता माजी व्यवस्थापक पेंदोर व माजी मुख्य लिपीक अमोल मेहरकुरे ह्यांनी कॉम्पुटर आपल्याकडे घेऊन आर्थिक व्यवहाराच्या नोंदी करून घेतल्या.

पण कॅशियरकडे रजिस्टरला नोंद घेण्याकरिता जमाखर्चाचे वाऊचर दिले नाही. त्यामुळे चाचणी लेखापरीक्षणाच्या नऊ वर्षाच्या कालावधीमध्ये मोठा फरक आढळून आला. पतसंस्थेच्या हालचा (रूम) नऊ वर्षाचा किराया एजंट यांनी आपल्या खात्यामध्ये जमा करून उचल केली. मारुती पेंदोर व अमोल मेहरकुरे यांनी संस्था बंद असताना कॉम्प्युटर सॉफ्टवेअरच्या माध्यमातून इतर खातेदारांच्या खात्यावर गैरप्रकारे रक्कमेचा भरना दाखवून आपल्या नातेवाईकाच्या खात्यावर जमा खर्चाची नोंद घेतली आणि नगदी रकमेची उचल केली.

दैनिक बचत ठेव खाते एक वर्षानंतर बंद करून दुसरे खाते न उघडताच ओपनिंग बॅलन्स दाखवून गैरव्यवहार करून रक्कमेची उचल केली. दैनिक भरणा खातेदाराच्या खात्यामध्ये एकाच वेळी मोठ्या रकमेचा भरणा दाखविला आणि कॅश काउंटरला कमी रकमेचा भरणा करून एकाच दिवसाचे जादा व्याज देऊन रकमेची उचल केली. अध्यक्षाची स्वाक्षरी न घेता एक कोटी 88 लाख रुपयाचे गैरप्रकारे कर्ज वाटप करून रकमेची अफरातफर केली. खातेदारांचे नावाने बनावट कर्ज दाखवून लाखो रुपयाचा उपयोग स्व:तच्या फायद्यासाठी केला. संस्थेचे आर्थिक परिपत्रके चुकीची सादर करून चुकीचे अंकेक्षण करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता.

त्यामुळे सन 2012 ते 2021 या कालावधीत राष्ट्रसंत तुकडोजी नागरी सह पतसंस्था मर्या चिमुर पतसंस्थेतील गैरव्यवहारबाबत उपलेखापरीक्षक राजेश सुधाकर लांडगे यांनी तक्रार दाखल केली होती. विविध प्रकारे संस्थेचा आर्थीक व्यवहार केल्याने वार्षिक अहवालातील जमाखर्च पत्रकांमध्ये सन 2012 ते 2021 या नऊ वर्षाच्या कालावधीमध्ये 7 कोटी 66 लाख 90 हजार 510 रूपयाचे आर्थीक गैरव्यवहार झाल्याचे तपासात निष्पन्न झाले. या आरोपावरून माजी उपाध्यक्ष व माजी व्यवस्थापकांसह 9 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. नऊ वर्षांपर्यंत या प्रकरणाचा तपास थंडबस्त्यात होता. वारंवार मागणी करूनही न्याय मिळत नसल्याने अन्याय निवारण समितीच्या वतीने 24 दिवसांपासून चिमुरात साखळी उपोषण सुरू आहे. शुक्रवारी (दि. 19 मे) 24 व्या दिवशी चंद्रपूर पोलिसांनी सकाळी चिमुरात येऊन माजी उपाध्यक्ष अरुण संभाजी मेहरकुरे, माजी व्यवस्थापक मारोती पेंदोर, माजी मुख्य लिपिक अमोल मेहरकुरे, अतुल मेहरकुरे आदी चौघांना अटक केली. या कारवाईने सहकार क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT