गोंदिया; पुढारी वृत्तसेवा: लाखांदूर तालुक्यातील पिंपळगाव (को.) येथील अर्जुनी तालुक्यातील कोरंभी/ टोला येथे भीषण अपघात झाला. ट्रकने मोटर सायकलला धडक दिल्याने दिल्याने हा अपघात झाला. या अपघातात मायलेक जागीच ठार झाले आहेत.
लहान मुलीची भेट घेऊन, मोठ्या मुलीकडे मोटार सायकलने निघालेल्या मायलेकावर काळाने अचानक झडप घातली. यात ट्रकने मोटर सायकलला धडक दिल्याने मुलासह आईचा जागीच मृत्यू झाला. मोहन फाल्गुन बांगरे (२४) व आई पुष्पकला फाल्गुन बांगरे (७०) असे मृतकाचे नाव असून, ते लाखांदूर तालुक्यातील पिंपळगाव कोहळी येथील रहिवासी आहेत.
प्राप्त माहितीनुसार आई पुष्पकला बांगरे या मुलगा मोहन बांगरेसह आपल्या विवाहित मुलीची भेट घेण्यासाठी बुधवारी (दि. ५ जुलै) सकाळी अर्जुनी मोरगाव तालुक्यातील मांडोखाल / टोला येथे गेल्या होत्या. मुलीच्या घरी जेवण आटोपून जवळच असलेल्या मोठ्या मुलीच्या मेंढकी या गावी भेटीसाठी जात असताना वडसाकडून येणाऱ्या भरधाव ट्रकने कोरंबी टोला गावाजवळ त्यांच्या मोटरसायकलला धडक दिली. या अपघातात मायलेकाचा जागीच मृत्यू झाला आहे. सदर घटनेची माहिती अर्जुनी मोरगाव पोलिसांनी दिली आहे.