विदर्भ

गडचिरोलीत धावत्या बसचे छत उडाले; प्रवाशांनी अनुभवला थरार! Gadchiroli Bus Roof

backup backup

गडचिरोली; पुढारी वृत्तसेवा : धावत्या कारमधून वरचे टप्पर उघडून स्टंटबाजी करतानाचे युवकांचे व्हीडिओ आपण बरेचदा बघत असतो. पण गडचिरोली जिल्ह्यात प्रत्यक्षात धावत्या बसचे छत उडाल्याचे समोर आले आहे. या 'छप्पर फाड के' बसमधील थरार प्रवाशांनी आज (दि. २६) प्रत्यक्षात अनुभवला. परिवहन महामंडळाचे दुर्लक्ष आणि भोंगळ कारभार या व्हिडिओमधून दिसून येतो.

जिल्ह्यात गडचिरोली व अहेरी हे दोन आगार आहेत. परंतु दोन्ही ठिकाणी अनेक बसेस भंगार अवस्थेतील आहेत. दोन दिवसांपूर्वी धानोरा गावाजवळ एका बसच्या स्टिअरिंगमध्ये बिघाड झाल्याने ती नाल्याच्या पुलावरील खांबाला अडकली आणि प्रवासी बालंबाल बचावले. ही घटना ताजी असतानाच आज (दि. २६) गडचिरोली-अहेरी मार्गावर एका धावत्या बसचे छत उडाल्याचे दिसून आले. अहेरी आगाराची ही एमएच ४०-वाय ५४९४ या क्रमांकाची बस आज (दि. २६) सकाळी ६ वाजता अहेरी येथून मुलचेरामार्गे गडचिरोलीला आली. परत जाताना अचानक या बसचे छत एका बाजूने उडाले. चालकानेही ती बस तशाच अवस्थेत अहेरीपर्यंत नेली. प्रवाशांनी या बसमधला हा जीवघेणा थरार अनुभवला. समाज माध्यमांवर या बसचा व्हीडिओ व्हायरल झाला आणि परिवहन महामंडळाच्या भंगार कारभारावर लोक तुटून पडताना दिसले.

SCROLL FOR NEXT