चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : चंद्रपूर शहराला लागून असलेल्या दुर्गापूर परिसरात दहशत माजविणाऱ्या बिबट मादीला बेटची शिकार करताना बेशुध्द करून जेरबंद करण्यास वनविभागाला यश आले. शुक्रवारी (दि.१३) पहाटे ४ च्या सुमारास दुर्गापूर परिसरात पाळत ठेवून असलेल्या वनविभागाच्या शुटरने तीला ट्रँगुजलाईज केले. त्यानंतर ट्रॉझिट ट्रिटमेंट सेंटरमध्ये बिबट मादीला ठेवण्यात आले आहे. दुर्गापूर व ऊर्जानगर परिसरात दशहत माजवून नागरिकांचे बळी घेणारीच बिबट मादी असल्याचे वनविभागाने शिक्कामोर्तब केले आहे असून बिबट मादीला पकडल्याने नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
मागील ३ महिन्यांपासून दुर्गापूर, ऊर्जानगर व वेकोली परिसरात बिबट्याने दशहत माजवून अनेक नागरिकांचे बळी घेतले आहे. शिवाय काही लहान मुलांनाही घरून उचलून नेत जीव घेतला आहे. त्यामुळे या भागात नागरिकांमध्ये बिबट्याची दहशत पसरली होती. तीन दिवसांपूर्वीच एका ३ वर्षाची चिमुकली दुर्गापूर वार्ड क्रं. १ मध्ये अंगणात खेळत असताना उचलून नेण्याचा प्रयत्न केला. परंतु वेळीच चिमुकलीच्या आईने बिबट्याला हाकलून लावल्याने पुढील अनर्थ टळला होता.
त्यानंतर संतापलेल्या नागरिकांनी बिबट्याला ठार मारण्याची मागणी लावून धरत वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यासह १० वन कर्मचाऱ्यांना घेराव घातला होता. अखेर मुख्य वनसंरक्षक प्रकाश लोणकर यांनी घटनास्थळी येऊन नरभक्षक बिबट्याला बेशुध्द अथवा गोळ्या घालण्याचे आदेश दिले होते.
नरभक्षक बिबट्याला जेरबंद करण्यासाठी दुर्गापूर परिसरात ४ पिंजरे व कॅमेरा ट्रॅप लावण्यात आले होते. वनपरिक्षेत्राधिकारी यांच्या नेतृत्वात क्षेत्रीय पथक, संरक्षण पथक, आर. आर. युनिट टीम, पशुवैद्यकीय अधिकारी, तालुका व्याघ्र प्रकल्प अधिकारी, शुटर आरआरटी आणि स्थानिक स्तरावरील पीआरटी आदी पथकांतील ३५ सदस्यांचा ताफा बिबट्याच्या मागावर होता.
परिसरात लावण्यात आलेल्या पिंजऱ्याजवळ बिबट येत होता, परंतु पिंजऱ्यात शिरत नव्हता. हुलकावणी देत पळून जात होता. वेळोवेळी आपले लोकेशन बदलत होता. या परिसरात लावण्यात आलेल्या ट्रॅप कॅमेरामध्ये आढळून आलेल्या बिबटच्या फोटोवरून ती बिबट मादी असल्याचे निष्पन्न झाले. शिवाय ती सात वर्षाची आहे. गावात घरात येऊन नागरिकांचे बळी घेणारी तीच बिबट मादी असल्याचे निष्पन्न झालेनंतर वनविभागाने गुरूवारपासून तिची शोध मोहीम सुरू केली.
सायंकाळी बिबट मादीचा वावर असलेल्या परिसरात वनविभागाचा लोक मागोवा घेत असताना रात्री साडेसातच्या सुमारास दुर्गापरू येथील वार्ड क्रं. ३ कडे बिबट जाताना आढळून आली. यावेळी मागावर असलेल्या कर्मचार्यांच्या सिन्नाळा फाट्याजवळील झुडपात बिबट मादी बसल्याचे आढळून आले. यावर वनपरिक्षेत्राधिकारी, वैद्यकीय अधिकारी आणि शुटर लक्ष ठेवून होते.
आज शुक्रवारी पहाटे ४ च्या सुमारास बिबट मादीने बेटची शिकार केली. त्याक्षणी शुटरने ट्रँगुलाईज गनद्वारे तीला बेशुध्द केले. त्यानंतर बिबटला चंद्रपूरमधील ट्रॉझिंट ट्रिटमेंट सेंटर मध्ये ठेवण्यात आले आहे. मात्र, या परिसरात नागरिकांच्या जीवितास धोका असा धोका पुन्हा होऊ नये, याकरीता वाघ व बिबट्याची शोध मोहीम सुरू ठेवण्यात येणार असल्याचे वनअधिकार्याकडून सांगण्यात आले आहे.
महिनाभरापूर्वी एक बिबट्या जेरबंद करण्यात आला होता. त्यानंतर आज शुक्रवारी पुन्हा एका नरभक्षक बिबट मादीला जेरबंद करण्यात आल्याने दुर्गापूर, ऊर्जानगर, वेकोली परिसरातील नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास घेतला आहे. विशेष म्हणजे आज बेशुध्द करून जेरबंद केलेली बिबट मादी दुर्गापूर परिसरात दहशत माजविणारी आणि नागरिकांचे जीव घेणारी असल्याचे वनविभागाने शिक्कामोर्तब केले आहे.