विदर्भ

चंद्रपूर जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस; धानपीक धोक्यात

अविनाश सुतार

चंद्रपूर : पुढारी वृत्तसेवा : विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने चंद्रपूर जिल्ह्याला झोडपून काढले आहे. आज (दि. ३०) दुपारनंतर पाऊस विसावला आहे. अवकाळी संकटाने उन्हाळी धानपिक धोक्यात आले आहे. वादळामुळे अनेक घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर फळबागांना मोठा फटका बसला आहे. दरम्यान, ४ मेपर्यंत चंद्रपूर जिल्ह्याला पुन्हा अवकाळीचा धोका असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.

संपूर्ण मार्च महिन्यात अवकाळी बरसल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. एप्रिल महिना संपला तरीही अवकाळी पावसाचा जोर कमी झालेला नाही. दिवसाआड पाऊस कोसळत आहे. विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळत असल्याने पिकांसह घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. भर उन्हाळा असताना अवकाळीमुळे जणू पावसाळा असल्याचा भास होत आहे.

शुक्रवारी सायंकाळपासून जिल्हाभरात अवकाळी पावसाला सुरूवात झाली. त्यानंतर थोडा पाऊस विसावला. रात्री परत पावसाने सुरूवात केली. रात्रभर अवकाळी पाऊस कोसळला. आज सकाळपासून जिल्हाभर दमदार पाऊस झाला. आज सकाळी पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. विजांचा कडकडाट आणि वादळामुळे नागरिकांना घराबाहेर पडता आले नाही. दुपारपर्यंत पाऊस सुरूच असल्याने नागरिकांना घरातच राहवे लागले.

ठिकठिकाणी वादळामुळे झाडे कोसळली. तर घरांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. काहींच्या घरांचे पत्रे, कौलारू उडाल्याची माहिती आहे. मार्चच्या अवकाळीत रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले. नुकसानीची मदत अद्याप शेतकऱ्यांपर्यंत पोहचली नसताना पूर्ण एप्रिल महिन्यात अवकाळी पाऊस कोसळत असल्याने सतत नुकसान होत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. जिल्या्हतील मूल, सिंदेवाही, नागभीड, ब्रम्हपूरी, चिमूर तालुक्यात धानाचे भरघोष उत्पादन घेतले जाते.

खरिपासोबत रब्बी हंगामात उन्हाळी धानपिकांचीही लागवड केली जात आहे. ज्यांच्याकडे सिंचनाची सुविधा आहे. त्यांच्याकडे उन्हाळी धानपिकांची लागवड करण्यात आली आहे. काही तालुक्यात उन्हाळी धानपिक कापणीला आले आहेत. काही ठिकाणी कापणीला वेळ आहे. परंतु अवकाळीमुळे उन्हाळी धानपिक संकटात सापडले आहे. कापणीला आलेले धानपिक कापण्यास विलंब होत आहे.

हवामान खात्याने पुन्हा ४ मे पर्यंत अवकाळीचा इशारा दिला आहे. त्यामुळे धानपिकांवरील संकट गडद होत आहे. आज लग्नाचा मुहूर्त असल्याने अनेक ठिकाणच्या विवाहाला अवकाळीचा फटका बसला. विजांचा कडकडाटात पाऊस कोसळल्याने वेळेत लग्न समारंभ पार पडले नाहीत. दुपारी पाऊस विसावलेला असला तरी ढगाळ वातावरणाने आणि वातावरणात गारवा निर्माण झाल्याने हिवाळ्याप्रमाणे गारठ्याचा अनुभव नागरिकांना आला.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT