विदर्भ

भंडारा : मेहुण्यानेच बहिणीच्या नवऱ्याला संपवले; चार जणांना अटक

स्वालिया न. शिकलगार

भंडारा : पुढारी वृत्तसेवा – बहिणीला मद्यपी पती त्रास देत होता. त्या प्रकाराला कंटाळून मेहुण्यानेच आपल्या मित्रांच्या मदतीने तरुणाचा खून केल्याचे पोलिस तपासात पुढे आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी चार जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदविला आहे.

मंगेश प्रेमलाल वाढई (वय ३५, रा. पळसगाव, ता. साकोली) असे मृतकाचे नाव आहे. मेहुण्याने मित्रांच्या मदतीने खून करून मृतदेह गोसे धरणाच्या बँकवाटरमध्ये फेकला. या प्रकरणी मेहुणा विलास केवलदास ऊके (वय ३०, रा. भोसा टाकळी) प्रमोद साकोरे (वय ३५, रा. खोकरला), जितेंद्र अंबादे (वय ३५, रा. शिंगोरी), नरेंद्र आगरे (वय ३२, रा. मानेगाव) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

मंगेश हा मद्यपी असल्याने त्याला कुटुंबीयांनी भंडारा येथे व्यसनमुक्ती केंद्रामध्ये १९ डिसेंबर २०२२ ला पाठवले होते. मात्र तो स्वगावी पळसगावला पळून आला होता. २५ जानेवारी २०२३ ला व्यसनमुक्तीचे कर्मचारी व त्याचा मेहुणा विलास उके (रा. भंडारा) यांच्यासोबत तो भंडारा येथे गेल्याचे त्याच्या आईने पोलिसांना सांगितले. मात्र २७ जानेवारी रोजी त्याचा मृतदेह गोसे प्रकल्पाकडे जाणाऱ्या पुलाखाली आढळून आला होता.

पोलिस अधीक्षक लोहित मतानी, अतिरिक्त पोलिस अधीक्षक ईश्वर कातखेडे, पोलिस उपविभागीय अधिकारी संजय पाटील यांचे मार्गदर्शनात अड्याळचे ठाणेदार सुधीर बोरकुटे यांनी तपासचक्रे फिरवून मृतकचा मेहुणा व त्याच्या मित्रांना ताब्यात घेतले. पोलिसी हिसका दाखविताच आरोपींनी गुन्हा कबूल केला. आम्हीच त्याचा खून केला व मृतदेह पुलाखाली पिकअप वाहनाने टाकल्याची कबुली दिली.

पुढील तपास ठाणेदार सुधीर बोरकुटे, पोलिस उपनिरीक्षक हरिचंद्र इंगोले, सुभाष मस्के, संदीप नवरखेडे, सुभाष राहांगडाले, भूमेश्वर शिंगाळे करीत आहेत.

SCROLL FOR NEXT