चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : बल्लारपूर पॅसेंजरमध्ये अचानक शार्ट सर्किट झाल्याने धावती रेल्वे अचानक बंद पडली. रेल्वेतील विद्यूत प्रवाह व पंखे बंद झाल्याने प्रवाशांची एकच तारांबळ उडाली. जीव वाचविण्यासाठी काही प्रवाशांनी रेल्वेतून उड्या मारल्याने चांगलाच गोंधळ निर्माण झाला होता. ही घटना गुरूवारी (दि.२) सायंकाळी माजरी रेल्वे स्थानकावर घडली. बंद पडलेली रेल्वे माजरी येथेच असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
दररोज बल्लारपूर ते वर्धा ही पॅसेंजर सायंकाळी बल्लारपूर येथून सुटते. गुरूवारी सायंकाळी पॅसेंजर बल्लारपूर येथून निघाली. भादंक (भद्रावती) येथे पॅसेंजर आल्यानंतर काही मिनिट थांबली आणि थेट पुढच्या रेल्वे स्थानकाकडे निघाली. मात्र, येथून १५ किमी अंतरावरील माजरी रेल्वेस्थानकावर पॅसेंजर पोहचताच शार्ट सर्कीट झाल्यामुळे गाडी अचानक बंद पडली. डब्यातील पंखे आणि लाईट बंद झाल्याने प्रवाशांनी एकच गोंधळ घातला. सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेने रेल्वेत एकच गोंधळ झाल्याने काही प्रवाशांनी डब्यातून बाहेर उड्या मारल्या. प्रवाशांना काहीही सुचेनासे झाल्याने प्रवाशांची तारांबळ उडाली.
जीव वाचविण्याच्या भितीने प्रवासी माजरी रेल्वे स्थानकावर उतरले. रेल्वे प्रशासनाला माहिती देण्यात आली. बराचवेळ रेल्वेतील प्रवाशांना रेल्वेत काय झाले आहे? हे कळायला मार्ग नव्हता. परंतु नंतर प्रवाशांना शार्ट सर्किटची माहिती मिळाली. रेल्वे बंद पडल्यामुळे सर्व प्रवासी माजरी स्थानकावर एकत्र आले. बराच वेळ होऊनही गाडी सुरू न झाल्याने प्रवासी त्रस्त झाले. याठिकाणी प्रवाशांची गैरसोय झाल्याचे पहायला मिळाले. पिण्यासाठी पाणी नव्हते. त्यामुळे प्रवाशांनी रेल्वेप्रशासनाच्या कारभाराविरोधात संताप व्यक्त केला. बराचवेळ होऊनही रेल्वे दुरूस्त झाली नव्हती. शिवाय पर्यायी व्यवस्था उपलब्ध करण्यात आली नाही. त्यामुळे प्रवाशांना माजरी रेल्वे स्थानकावर ताटकळत राहावे लागले.