नागपूर: पुढारी वृत्तसेवा: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या वतीने पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता ५ वी व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता ८ वी संपूर्ण राज्यात आज (दि.१२) घेण्यात येत आहे. विशेष म्हणजे यावर्षी १० हजार विद्यार्थी वाढले आहेत. नागपूर जिल्ह्यात एकूण २०९ केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी यंदा सुमारे ३२ हजार ९८९ विद्यार्थी आहेत. गतवर्षी या परीक्षेला जिल्ह्यातून एकूण २२ हजार ८०६ विद्यार्थी बसले होते. यंदा झालेली वाढ या परीक्षेकडे विद्यार्थ्यांचा कल वाढत असल्याचे अधोरेखित करणारी आहे.
२०२२-२३ शैक्षणिक सत्र सुरु झाल्यापासून वातावरण निर्मिती व्हावी म्हणून जि. प. चे सीईओ योगेश कुंभेजकरांनी पुढाकार घेतला होता. त्यांनी शिक्षकांनाही आवश्यक सूचना करीत 'एक तास शिष्यवृत्तीकरिता' उपक्रम राबविला. इतकेच नव्हे तर अधूनमधून विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा सराव योग्य होतो की नाही, याची पाहणीही कुंभेजकर करीत होते. त्याचे फलितही शिष्यवृत्तीच्या मुख्य परीक्षेत दिसून आले. यंदा विद्यमान सीईओ सौम्या शर्मा व शिक्षणाधिकारी (प्राथ.) रोहिणी कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली ६ जानेवारीला शिष्यवृत्तीची सराव परीक्षा पार पडली. याचा निकाल लवकरच येणार आहे. आता शिष्यवृत्तीची मुख्य परीक्षा आज होत आहे. यासाठी शहरीभागात ५३ व १५६ केंद्र ग्रामीणमध्ये असून यंदा या परीक्षेसाठी इयत्ता ५ वीतील १८ हजार ३७४ व ८ वीतील १४ हजार ६१५ विद्यार्थी बसले आहेत. उत्तीर्णतेचा टक्का वाढावा यासाठी जि.प.कडून विविध प्रयत्नही झाले. मुख्य परीक्षा ७५०० विद्यार्थी देणार आहेत.
रविवारी दोन पेपर होणार आहेत. पहिला पेपर (भाषा व गणित) सकाळी ११ ते १२.३० दरम्यान, तर दुसरा पेपर (तृतीय भाषा व बुध्दिमत्ता चाचणी) २ ते ३.३० पर्यंत होईल. यंदा कार्बनलेस उत्तर पत्रिका राहणार असल्याने विद्यार्थ्यांना आपल्या गुणांची पडताळणी करणे सोयीचे व्हावे, म्हणून उत्तर पत्रिकेची एक प्रत मिळणार आहे. दरम्यान, गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी जिल्हा परिषदेकडून भरारी पथकही सज्ज ठेवण्यात आले आहे.
हेही वाचा