विदर्भ

सरकारी कामात अडथळा, कोर्ट उठेपर्यंत शिक्षा; अमरावती जिल्हा न्यायालयाचा निकाल 

backup backup
अमरावती, पुढारी वृत्तसेवा : शिक्षणाधिकारी कार्यालयात जाऊन तोडफोड करून शासकीय कामात अडथळा निर्माण करणाऱ्या तीन आरोपींना अमरावती जिल्हा सत्र न्यायालयाने कोर्ट उठेपर्यंतची शिक्षा सुनावली. ज्ञानेश्वर उर्फ नाना दादाराव नागमोते (रा. नानकशाही वाडा, नमुना), नाना मोहन जाधव (रा. आसरा, ता. भातकुली) व अशोक रामदास कैथवास (रा. शिवणी खुर्द, ता. भातकुली) अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणातील दोन महिला आरोपींना पुराव्या अभावी निर्दोष सोडण्यात आले.
सुत्रांनुसार, तत्कालीन शिक्षणाधिकारी नवनाथ बळवंत खेनट यांच्यातर्फे ऋषिकेश गंगाधरराव कोकाटे (रा. विजय कॉलनी, कठोरा नाका) यांनी १७ जुलै २००६ रोजी गाडगेनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली होती. ऋषिकेश कोकाटे हे शिक्षणाधिकारी कार्यालयात कार्यरत असताना १७ जुलै २००६ रोजी आरोपी हे शिक्षणाधिकारी यांच्या कार्यालयात आले आणि त्यांनी शिक्षणाधिकारी यांच्यासोबत प्रवेश घेण्यासदंर्भात वाद केला. त्यानंतर त्यांनी कार्यालयातील काचेचे कॅबिन, दिवे आणि खुर्च्याची तोडफोड केली. सदर आरोपींच्या या कृत्यामुळे शिक्षणाधिकारी खेनट यांना दुखापत झाली.
सर्व आरोपीनी जाणीवपूर्वक शिक्षणाधिकारी यांच्या कार्यालयात जावून त्यांना शासकिय काम करण्यापासून परावृत्त केले व शासकिय कामात अडथळा निर्माण केला. त्यानुसार खेनट शिक्षणाधिकारी यांच्यातर्फे ऋषिकेश गंगाधरराव कोकाटे यांनी सर्व आरोपीविरूध्द गाडगेनगर ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून गाडगेनगर पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास पूर्ण केला आणि न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे अतिरीक्त सरकारी वकील अॅड. प्रशांत व्हि. देशमुख यांनी महत्वाचे साक्षीदार तपासले. दोन्ही पक्षाच्या युक्तीवादानंतर ज्ञानेश्वर उर्फ नाना दादाराव नागमोते, नाना जाधव व अशोक कैथवास यांच्या विरुध्द भादंवीची कलम ३५३, ३३२, ४२७ अन्वये गुन्हा सिध्द झाला. त्यामुळे जिल्हा व सत्र न्यायधीश (क्रमांक ३) चे न्यायधीश आर. व्ही. ताम्हाणेकर यांच्या
न्यायालयाने तीन्ही आरोपींना कोर्ट उठेपर्यंत शिक्षा, प्रत्येकी २ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास दोन महिने साधा कारावास. तसेच कलम ३३२ अन्वये कोर्ट उठेपर्यंत शिक्षा, प्रत्येकी ३ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास तीन महिने साधा कारावासाची शिक्षा सुनावली आहे. तसेच कलम ४२७ अन्वये प्रत्येकी पाचशे रुपये दंड व दंड न भरल्यास पंधरा दिवस साध्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. तर दोन आरोपींना निर्दोष सोडण्यात आले. सदर प्रकरणात पैरवी अधिकारी म्हणून मुरली डोईजड, बाबाराव मेश्राम व एन.पी.सी. अरुण
हटवार यांनी सहकार्य केले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT