चंद्रपूर 
विदर्भ

चंद्रपूर : शेतकरी महिलेने शोधले धानाचे नवीन वाण; महाराष्ट्रासह अनेक राज्यातून मागणी

मोनिका क्षीरसागर

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा:  विदर्भातील नागभीड तालुक्यातील तळोधी (बा.) हे गाव धानाचे कोठार म्हणून प्रसिद्ध आहे. येथील काळ्या कसदार मातीतून येथील महिला शेतकऱ्याने धानाचे (तांदूळ) नवीन वाण शोधून काढले आहे. विदर्भातील आसावरी पोशट्टीवार या महिलेने धानाच्या जातींवर संशोधन करीत विविध वाण विकसित केले आहे. या वाणाला महाराष्ट्रासह अनेक राज्यातून मागणी वाढत आहे.

प्रसिद्ध धान उत्पादक शेतकरी अण्णासाहेब पोशट्टीवार यांच्या सून आहेत. त्यांनी वाणाच्या संशोधनात टाकलेले पाऊल हे नवीन हरितक्रांतीच आहे. सध्या वापरात असलेले एचएमटी व जयश्रीराम सारखे धानाचे वाण याच मातीतून संशोधन झाले आणि आज हे अनेक ग्राहकांच्या गळ्यातील ताईत बनले आहे.

शेती व्यवसाय म्हणजे प्रत्येकवेळी तो पुरूषांनीच करावा असा समज आहे. परंतु अनेक महिला शेतकऱ्यांनी कृषी क्षेत्रात पाऊल टाकून पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून त्यामध्ये यश मिळवले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील नागभिड तालुक्यातील तळोधी (बा.) येथील महिला शेतकरी आसावरी पोशट्टीवार यांनी, हरितक्रांती घडविण्याच्या दिशेने कूच केली आहे. शेतीलाच प्रयोग शाळा मानणारे येथील प्रतिष्ठीत शेतकरी अण्णासाहेब पोशट्टीवार (सासरे) यांची प्रेरणा घेऊन त्यांनी स्वतः धान संशोधन करून, वाण निर्मिती करण्याकरिता झोकून दिले. अत्यंत बारीक निरीक्षणातून त्यांनी विविध बारीक पोतीच्या सुवासिक, लाल, काळ्या धान वाणांची निर्मिती केली आहे.

पाच वर्षांपासून स्वत:च्या ६ एकर शेतात धानाची प्रयोगशाळा तयार करून, हरितक्रांती घडविण्याकरिता पुढाकार घेतला आहे. विशेष म्हणजे याच तालुक्यातील नांदेड येथील कृषीभूषण एचएमटी तांदळाचे जणक दादाजी खोब्रागडे यांनीही संशोधनातून एचएमटी वाण पुढे आणले. तर उश्राळमेंढा येथील श्रीराम लांजेवार यांनी श्रीराम नावाचे धान वाणाचे संशोधन केले. हे दोन्ही वाण आज शेतकऱ्यांच्या गळ्यातील ताईत बनले आहेत. त्याच मातीतून आणि परिसरातून आता आसावरी पोशट्टीवार यांचे हे संशोधनाचे कार्य हरितक्रांतीच्या दिशेन पडलेले एक महत्त्वाचे पाऊल आहे.

महाराष्ट्रासह अनेक राज्यातून वाणांना मागणी

सद्य:स्थितीत पूर्व विदर्भासाठी पूरक असलेल्या लाल तांदळाची निर्मिती त्यांनी केली आहे. तळोधी रेड -25 आणि लाल गुलाब 2-12, 12 -9 या धानाच्या दोन वाणांची निर्मिती त्यांनी केली आहे. हे वाण एक्सीडेंट गुणधर्मामुळे रोगांवर गुणकारी असल्याचे त्यांच्या संशोधनातून समोर आले आहे. उच्च रक्तदाब मधुमेह, हृदयविकार यासारख्या रोगांवर ते गुणकारी ठरत आहे. सद्य:स्थितीत शेतकरी व शास्त्रज्ञ यांच्या संयुक्त प्रयत्नाने तळोधी रेड -25 निशिगंध, तळोधी हिरा -125, साईभोग,गणेश,चाफा, गुलाब, चिंन्नोर -27,पार्वती चींन्नोर, तळोधी हिरा-135,पार्वती सुत- 27, बसमती 33- 2, निलम आदी धानाच्या वाणांची निर्मिती केली आहे. या वाणांतून निर्माण झालेला तांदूळ कर्नाटक,आंध्रप्रदेश, मराठवाडा, तेलंगणा राज्यात नागरिकांच्या पसंतीस उतरला आहे.

शुद्ध व प्रचलित धान वाण ग्राहकांना उपलब्ध करून देण्याचा मानस

कमी दिवसात जास्त उत्पन्न देणाऱ्या वाण निर्मिती करून शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्याचा त्यांचा मानस आहे. आसावरी पोशट्टीवार यांचा धानाच्या वाणांचा प्रयोग अभ्यासण्याकरिता राज्यातून दूरवरून प्रगतशील शेतकरी या ठिकाणी येत आहेत. त्यांच्या शेतातील प्रयोगशाळेला राजेंद्र दुणेदार पारशिवणी, संजय सत्येकार कन्हान, कृषी पत्रकार विनोद इंगोले नागपूर, राजेश गायधने राईस मिल मालक पवनी, के.एन.शांतलवार,महाळगी भंडारा यांनी भेट देऊन अभ्यास केला आहे. सकस व शुद्ध बियाण्यांपासून शेतकरी दूर जात आहे. शेतकऱ्यांना शुद्ध व प्रचलित बियानांचीच लागवड करून देण्याचा त्याचा मानस आहे.

'वर्ल्ड इनोव्हेटर' पुरस्काराने सन्मानित

आसावरी पोशट्टीवार यांनी, वाण संशोधनात केलेली हरितक्रांती त्यांना कृषी क्षेत्रात नवी ओळख निर्माण करूण देणारी ठरली आहे. त्यामुळेच त्यांच्या कार्याची पावती म्हणून एम एस एम ई-डी आय आणि वर्ल्ड वाईड फार्मकडून 'वर्ल्ड इनोव्हेटर' या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले. मुंबईचे भाभा अनुसंशोधन केंद्राचे माजी शास्त्रज्ञ डॉ.शरद ई. पवार यांचे वेळीवेळी त्यांना मार्गदर्शन लाभले आहे. तब्बल 20 वर्षांपासून त्यांचे कुटुंबिय धान वाण संशोधन कार्यात काम करीत आहेत. पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून महिलांनी शेती संशोधनात पाऊले टाकावीत अशी इच्छा आसावरी पोशट्टीवार यांनी व्यक्त केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT