नागपूर; पुढारी वृत्तसेवा : नागपुरात पावसामुळे हजारो नागरिक, व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. हे सरकारचे अपयश आहे. आपत्ती व्यवस्थापन शिल्लकच राहिले नाही. भाजपचे राज्य उपमुख्यमंत्री नागपुरातील, केंद्रातील मंत्री नागपुरात, राज्याचे सरकार इथून चालवल्याचा दावा केला जातो या सर्वांचे, विकासाचे पितळ उघडे पडले असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला.
भाजपचे नेते उगीच विकासाचा आव आणतात. विकासाच्या नावाखाली जे विनाश झाले, ते यानिमित्ताने उघडे पडले अनेक वर्षांपासून मनपा आणि इतर ठिकाणी सत्तेत बसलेले अपयशी ठरले आहेत. भाजपने नागपूरकरांची माफी मागावी. भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांची विद्वत्ता समोर आली आहे. त्यांनी पत्रकारांना चहा पाजा आणि धाब्यावर न्या असे म्हटल्याचे बाहेर आले आहे. हे तर भाजपने पत्रकारांचे अवमूल्यन केले आहे.
अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे , लवकर पंचनामे करून खऱ्या नुकसानाची मदत करावी. फक्त दहा हजार, पन्नास हजार मदत करून चालणार नाही.झालेल्या नुकसानाची भरपाई ची जबाबदारी भाजप ची आहे.अंबाझरी तलावाजवळ विवेकानंद स्मारकाच्या स्वरूपात नियमबाह्य बांधकाम केले आहे. त्याचे सामाजिक लेखापरीक्षण झाले पाहिजे.
अंबाझरी तलाव कधीही फुटू शकतो. त्यामुळे आता स्ट्रक्चरल ऑडिट आणि सोशल ऑडिट ही झाले पाहिजे ही काँग्रेसची मागणी आहे
नागपुरातील हिरवळ संपवून अनियोजित विकास केला गेला. नागपुरात ड्रेनेज सिस्टम नाही, त्याचा हा परिणाम आहे.
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी महिला आरक्षणाचे समर्थन केले. मात्र, जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे अशी त्यांची मागणी आहे. जातीनिहाय गणनेच्या मागणीचा विरोध का केला जात आहे? भाजपने याविषयीचे उत्तर द्यावे, हा भाजपचा जूमला आहे. दरम्यान, आमदार अपात्रता बाबतीत छेडले असता शेड्युल 10 प्रमाणे ही सुनावणी विशिष्ट काळात संपायला हवी होती. मात्र, भाजप सरकारचा दबाव, केंद्रीय यंत्रणांचा दबाव यामुळे हे होऊ शकले नाही. शेवटी सर्वोच्च न्यायालयाने कान टोचले, अध्यक्षांना निर्देश दिले. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनाही अध्यक्षांसारखे अधिकार होते. तेव्हा त्यांनी प्रतिज्ञा पत्र दिले होते. जेव्हा केव्हा अध्यक्षांचा निकाल येईल तेव्हा लोकशाहीचे वाटोळे केल्याचे पाप समोर येईल.
मुळात,कोण कोणाला भेटतात? याच्याशी आमचे सोयरसुतक नाही. शरद पवार यांचा स्वतंत्र पक्ष आहे. ते कोणाला भेटतात? याच्याशी आम्हाला देणेघेणे नाही असे अदानी-पवार भेटीबद्दल स्पष्ट केले. शेवटी जे भाजप विरोधात लढायला तयार आहेत, ते आमच्या सोबत आहे, हे आम्ही आधीच सांगितले आहे. नागपूरकरांना भाजपच्या सत्तेतील लोकांवर जे विश्वास होते, ते आता नाही, कारण या नेत्यांनी लोकांचा विश्वासघात केला आहे असेही नाना पटोले म्हणाले.
नागपूर – कार्यकर्त्यांना उद्देशून बोलण्याचे ओघात पत्रकारांबद्दल केलेले व्यक्तव्य हे चुकीचे असून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यभरातील पत्रकारांची माफी मागावी, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी मंत्री अनिल देशमुख यांनी अमरावती येथे सोमवारी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले आहे.