नागपूर : राज्यातील वाढती बेरोजगारी, राजकीय गुन्हेगारी, सामाजिक जातीय धार्मिक तेढ, महिला अत्याचार , शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नांवर राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने 15 ते 19 मार्च पुणे ते मुंबई अशी पदयात्रा काढण्याचा निर्णय घेतला आहे. प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांचे नेतृत्वात ही पदयात्रा पुण्यातील लाल महाल येथून निघेल आणि मुंबईत विधान भवनला 19 मार्च रोजी समारोप होईल.
विधान भवनाला काँग्रेस कार्यकर्ते घेराव घालतील अशी माहिती प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस संघटन प्रमुख श्रीनिवास नालमवार यांनी दिली. प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव अक्षय डोरलीकर उपस्थित होते. गेले काही दिवस युवक काँग्रेसच्या विविध पदाधिकाऱ्यांच्या, नेता पुत्रांच्या हकालपट्टीने चर्चेत आलेली युवक काँग्रेस आता युवकांच्या आणि राज्यातील महत्त्वाच्या प्रश्नावर महायुती सरकारचे लक्ष वेधण्याच्या तयारीत आहे.