नागपूर : पुढारी वृत्तसेवा : पूर्ववैमनस्यातून एका तरुणाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना नागपुरातील मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी (दि.३) रात्री घडली. संशयित आरोपी हल्लेखोरांनी मृतावर चार राऊंड फायर केले. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. सोहेल खान (वय ३५) असे मृताचे नाव आहे. दोन संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अन्य दोघे फरार झाले आहेत. (Nagpur Crime News)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मारेकरी अज्ञात हल्लेखोर एका कारमधून मानेवाडा परिसरात आले. त्यांनी अचानक गोळीबार सुरू केला. या घटनेनंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. माहिती मिळताच मानकापूर पोलीस व गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी एक व्यक्ती रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनाकरीता पाठवून तपास सुरू केला. या प्रकरणात मानेवाडा पोलिसांनी दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे.
अटकेत असलेल्या आरोपीमध्ये एक डोंगरे तर दुसऱ्याचे नाव मसराम असल्याचे सांगण्यात येत आहे. फरार आरोपींच्या शोधात मानेवाडा पोलिसांचे एक पथक मागावर आहे. या हत्याकांडाने मानकापूर परिसरात खळबळ उडाली आहे. पोलीस आता या प्रकरणाच्या तळाशी जाऊन या घटनेमागचे खरे कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. प्राथमिक तपासात पूर्व वैमनस्यातून हत्या करण्यात आल्याचे कारण समोर आले आहे. लवकरच फरार आरोपींनाही अटक करण्यात येणार असल्याचे मानेवाडा पोलिसांनी सांगितले आहे.