नागपूर

Yogi Adityanath : योगी आदित्यनाथ म्हणाले, मतदान करा अन् अयोध्येला या…  

अविनाश सुतार

नागपूर, पुढारी वृत्तसेवा :  नागपूर हे ऊर्जा स्थान आहे. 'जो राम को लाये है, हम उन्हीको लायेंगे… ! हा नारा सर्वत्र बुलंद होत आहे. तुम्ही 19 रोजी मतदान करा आणि अयोध्येत प्रभू रामाच्या दर्शनाला या, सर्व व्यवस्था आम्ही करू, अशी ग्वाही उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी नागपूरकरांना दिली. Yogi Adityanath

योगी म्हणाले की, कधीकाळी होळीच्या आधी एक गाणे वाजत होते, होली खेले रघुवीरा.. मात्र अयोध्येत होळी खेळली जात नव्हती. 500 वर्षानंतर भव्य होळी खेळल्या गेली. यात सहभागी होण्याचे भाग्य आम्हाला लाभले. रामलल्ला भव्य मंदिरात विराजमान झाले. हे काँग्रेस किंवा इतर पक्ष देऊ शकला असता का, असा सवाल केला. केंद्रीय मंत्री व भाजप उमेदवार नितीन गडकरी यांच्या प्रचारासाठी काटोल रोडवरील फ्रेंड्स कॉलनीत जाहीर सभेत ते बोलत होते. Yogi Adityanath

1947 साली भारत स्वतंत्र झाला. अनेक सरकारे आली मात्र पायाभूत सुविधांबाबत कोणी विचारही केला नाही. आज सर्वत्र विना भेदभाव सर्वत्र विकास होत असून गरीब कल्याणकारी योजनांचा लाभ दिला जातो.सर्वांचा साथ, सर्वांचा विकास होत आहे. देशातील विविध कल्याणकारी योजनांचा त्यांनी या निमित्ताने आढावा घेतला. वर्ल्डक्लास पायाभूत सुविधाद्वारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देशात पायाभूत सुविधांचे एक मॉडेल विकसित केले आहे.

आपल्या एका मताने देशाचे चित्र बदलले आहे. राजकारणातील अजातशत्रू असा गडकरींचा यावेळी योगी आदित्यनाथ यांनी उल्लेख केला. आज उत्तरप्रदेशमध्ये संचारबंदी लागत नाही, कावड यात्रा निघते. सामान्य लोक नव्हे गुन्हेगार तिथून पलायन करतात, असे आवर्जून सांगितले. जय श्रीराम, जय जय श्रीराम असा जयघोष करीत त्यांनी आपल्या भाषणाला विराम दिला. यावेळी आमदार प्रवीण दटके, मायाताई इवनाते, संजय भेंडे, दया शंकर तिवारी, संदीप जोशी, माजी आमदार सुधाकर देशमुख, परिणय फुके, संदीप जाधव आदी  उपस्थित होते.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT