Nagpur World Record Event
नागपूर : जनमानसांमध्ये आपल्या भजन- साहित्यातून राष्ट्रप्रेम जागृत करणारे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना ५७ व्या पुण्यतिथी निमित्त आज (दि.११) राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या वतीने 'या भारतात बंधुभाव नित्य वसु दे...' या सामूहिक विद्यापीठ गीत गायनातून विश्वविक्रमी आदरांजली अर्पण केली गेली.
राष्ट्रीय सेवा योजना विभाग, विद्यार्थी विकास विभाग, क्रीडा व शारीरिक शिक्षण विभाग आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अध्यासन यांच्या संयुक्त विद्यमाने हा विश्वविक्रमी सामूहिक विद्यापीठ गीत गायनाचा कार्यक्रम विद्यापीठाच्या जमनालाल बजाज प्रशासकीय भवनाजवळील मैदानावर आयोजित करण्यात आला.
केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी, अभिनेता भारत गणेशपुरे, राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, कुलगुरू माधवी खोडे चवरे ,श्री अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाचे सरचिटणीस जनार्दनपंत बोथे गुरुजी, विश्वविक्रम समिती, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य, प्रामुख्याने उपस्थित होते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी दिलेला करुणा, मानवता, बंधुभाव, एकात्मता, राष्ट्रप्रेम, तरुणांनी 'उद्योगी तरुण, वीर, शिलवान असावे' हा संदेश विद्यार्थ्यांसह समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचावा या उद्देशाने या आगळ्यावेगळ्या आदरांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. सुभाष कोंडावार, कुलसचिव डॉ. राजू हिवसे, कार्यक्रम आयोजन समिती अध्यक्ष तथा राज्यपालनामित व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. समय बनसोड यांच्यासह आयोजन समितीने यासाठी पुढाकार घेतला. विद्यार्थी शिक्षक कर्मचारी व नागरिकांना डिजिटल प्रमाणपत्र दिले जाणार आहे.