नागपूर: विधिमंडळ परिसरात प्रवेशासाठी आवश्यक असणाऱ्या प्रवेशपासची दीड हजारात विक्री केली असल्याची गंभीर बाब आज (दि.१२) विधानभवन परिसरात चर्चेत होती. या प्रकरणी सखोल चौकशी करावी व विक्री करण्यात सहाय्य करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कार्यवाही करण्याचे निर्देश विधानपरिषद तालिका सभापती कृपाल तुमाने यांनी दिले.
विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पाचव्या दिवशी विधानपरिषदेतील शिवसेना सदस्य हेमंत पाटील यांनी विधीमंडळात परिसरात प्रवेशासाठीच्या अभ्यागतांच्या पासेसची दीड हजारांत विक्री होत असल्याचा आरोप केला. विधानपरिषदेत बोलताना त्यांनी याबाबत माहिती दिली. आमचे काही कार्यकर्ते दिवसभर बाहेर उभे होते. मात्र आमचे पत्र असून देखील त्यांना पासेस मिळाल्या नाहीत. परंतु बाहेर दीड हजारांत प्रवेशासाठी पासेस विकण्यात येत आहेत. अशा पद्धतीने तर विधीमंडळाची सुरक्षाच धोक्यात आली असून ही लाजीरवाणी बाब आहे.
अशा पद्धतीने तर कधीही दहशतवादी आत शिरू शकतात. अशा पद्धतीने कुणी पासेस जारी केले व त्या बदल्यात पैसे घेतले याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी पाटील यांनी केली. यावर अमोल मिटकरी यांनी देखील आक्रमक पवित्रा घेतला. यंदा परिसरात गर्दी टाळण्यासाठी मर्यादित पासेस वाटण्यात येणार असल्याचे अधिवशनाच्या दुसऱ्याच दिवशी स्पष्ट करण्यात आले होते. मात्र सद्यस्थितीत परिसरात गर्दी आहे. नीट चालणे देखील कठीण झाले आहे. इतके सारे लोक आत कसे काय येत आहेत व इतक्या प्रमाणात पासेस का जारी करण्यात येत आहेत, असा सवाल मिटकरी यांनी उपस्थित केला. यावर तालिका सभापती कृपाल तुमाने यांनी सखोल चौकशी करण्यात यावी, असे निर्देश दिले.