नागपूर, पुढारी वृत्तसेवा : बीड पॅटर्नमध्ये तत्कालिन कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी घेतलेल्या निर्णयावर गेल्या काही दिवसात प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. या निर्णयांची समिती नेमून छाननी झाली पाहिजे. मंत्र्यांच्या आदेशाशिवाय हे होणे शक्य नाही, त्यामुळे याची चौकशी झाली पाहिजे. याची शिक्षा शेतकऱ्यांना होता कामा नये, अशी मागणी काँग्रेस नेते माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
१ रुपये पीक विमा हा बीड पॅटर्न म्हणून राज्य सरकारने आपली पाठ थोपटली. पण खरीप २०२४ हंगामात यात भ्रष्टाचार झाल्याचे समोर आले आहे. या योजने अंतर्गत ४ लाख अर्ज आले, त्यातील एक लाख ९ हजार बोगस अर्ज हे केवळ बीडमधून होते.आता शेतकऱ्यांना शिक्षा देऊ नका, ज्यांनी हे केले पैसे खाल्ले, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, असे वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.