आपल्या शेजारी बांगलादेशात जे काही झाले ते अतिशय दुर्दैवी असून भारतात अशा प्रकारच्या कुठल्याही गोष्टीचे समर्थन नक्कीच होणार नाही. ही आग आपल्याकडे नकोच, लवकरच परिस्थिती नियंत्रणात येईल असा विश्वास लोकसभेच्या माजी अध्यक्षा भाजपच्या ज्येष्ठ नेत्या श्रीमती सुमित्रा महाजन यांनी व्यक्त केला.
सध्या राजकारणात फारसे सक्रिय नसले तरी महत्त्वाच्या घडामोडींवर आपले लक्ष असते, असे स्पष्ट करतानाच त्यांनी शेजारच्या देशात जे झाले त्याची आग आपल्याकडे लागू नये, हिंदूंवरील अत्याचार किंवा तेथील एकंदरीत परिस्थितीत शेजारी देशात गडबड होणे नक्कीच चांगले नाही. भारतातील सर्वधर्मीयांनी एकजुटीने पंतप्रधानांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे यातून ते नक्कीच मार्ग काढतील असा विश्वास सुमित्रा महाजन यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला.
अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंती निमित्ताने देशभरात विविध कार्यक्रम होत आहेत. नागपुरातील अहिल्यादेवी मंदिर धंतोली येथे उद्या सुमित्रा महाजन यांनी लिहिलेल्या 'मातोश्री' या नाटकाचा प्रयोग होत आहे. यासाठी आपण आज नागपुरात आलो असून भाजप नेते राम शिंदे, डॉ विकास महात्मे यांच्यासह अहिल्यादेवींचे नातू यशवंतराव होळकर या कार्यक्रमासाठी येत असल्याची माहिती महाजन यांनी दिली.