नागपूर, पुढारी वृत्तसेवा : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना ठिकठिकाणी पोलिसांच्या तपासणीत मोठ्या प्रमाणावर रोकड पकडली जात आहे. अशातच विविध प्रकारच्या नोटांच्या तुकड्यांनी भरलेला एक ट्रक जळून खाक झाल्याचे कळताच खळबळ माजली. अर्थातच ट्रक भरून नोटा म्हटल्यावर सारेच क्षणभर दचकले. ही घटना बरबटी (जि. वर्धा) येथे आज (दि.१०) सकाळी घडली.
तातडीने पोलीस, प्रशासकीय यंत्रणा घटनास्थळी पोहोचली. याविषयीची माहिती मिळतात आसपासच्या गावातील लोकांनी या ठिकाणी गर्दी केली. तर्कवितर्क लावले जाऊ लागले.
सोळा चाकांचा ट्रक (युपी 12 सिटी 5327) हैदराबाद येथून उत्तर प्रदेशच्या दिशेने जात असल्याची माहिती मिळाली. या ट्रकमध्ये विविध प्रकारच्या नोटांचा तुकड्यांचा स्क्रॅप माल होता. शॉर्टसर्किटने या ट्रकला आग लागून तो जळून खाक झाला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रिझर्व्ह बँकेने अलीकडेच या स्क्रॅप मालाचा लिलाव केला होता. त्यानुसार, हा माल वाहून नेला जात होता. वर्धा जिल्ह्यातील सिंदी पोलीस यासंदर्भात अधिक तपास करीत आहेत.