नागपूर : ‘चोर, दरोडेखोर, डाकू, जमीन घोटाळेबाज यांना एकत्रित करून सरकार चालविले जात आहे. सत्ताधाऱ्यांनी महायुती जरूर करावी आणि महत्वाचे म्हणजे बॅलेटवर निवडणूक घ्यावी. जनता त्यांना जागा दाखवून देईल,’ असा इशारा काँग्रेसचे गटनेते विजय वडेट्टीवार यांनी शुक्रवारी विधानभवन परिसरात प्रसारमाध्यमांशी बोलताना दिला.
सरकार आणि निवडणूक आयोगावर टीका करताना विजय वडेट्टीवार म्हणाले,‘घुग्गुस नगरपालिकेचा कुठलाही विषय हायकोर्टात नव्हता. तेथील निवडणूक आम्ही जिंकणार होतो. त्यामुळे तिथल्या आमदारांच्या दबावापोटी निवडणूक आयोगाने निवडणूक थांबवली. अशा निवडणुका लांबणीवर टाकण्याचे पाप सरकारने केले आहे. जनतेचा कौल महायुतीच्या विरोधात जाणार आहे. त्यामुळेच निवडणुकांचे निकाल लांबविण्यात आले आहेत. निवडणुकीपूर्वीच बावनकुळे २६८ पैकी १७५ जागा जिंकणार, असे सांगतात. याला कुठला आधार आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे की, ईव्हीएममध्ये घोळ करून निवडणूक जिंकण्यात येत आहे.
’हैदराबाद गॅझेटिअरच्या अनुषंगाने काढण्यात आलेल्या जीआरचा काही फायदा होत नसल्याचे म्हटले जात आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना ते म्हणाले,‘ मराठा समाजाचे आंदोलक मनोज जरांगे यांचे आंदोलन संपविण्यासाठी सरकारने त्यांची बोळवण केली असेल तर हे धोकादायक आहे. एकीकडे ओबीसींना भडकवायचे आणि दुसरीकडे मराठ्यांना भडकवायचे व आपली पोळी शेकून घ्यायची, असे हे सरकार करत आहे. हैदराबाद गॅझेटीअरच्या संदर्भात सरकारने जो जीआर काढला आहे, त्यातून किती फायदा होतो, हे बघावे लागेल.
मराठवाड्यातील अनेकांनी यापूर्वीच ओबीसी प्रमाणपत्र मिळविले आहे. हे जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर दिसून येईल. जरांगे पाटलांचे आंदोलन संपविण्यासाठी हैदराबाद गॅझेटिअरच्या अनुषंगाने जीआर काढुनही फायदा होत नसेल तर, कोण चुकतेय याचा मराठा समाज विचार करेल.’ सुधीर मुनगंटीवार यांनी हिवाळी अधिवेशन केवळ हुरडा पार्टी खाण्यासाठी असते, अशी टीका केली. त्यावर बोलताना ते म्हणाले, ‘सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारला घरचा अहेर नव्हे तर आरसा दाखविला आहे.
गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमधील मुंबईत झालेल्या राड्याचा अहवाल विधीमंडळापुढे ठेवण्यात येणार आहे. त्यावर बोलताना ते म्हणाले,‘सत्ताधारी असो की विरोधक असो त्याच्यावर फौजदारी कारवाई व्हायला हवी. कुणालाही सोडू नये. जो चुकला असेल त्याच्यावर कारवाई व्हावी. रवी राणांच्या घरी चार-पाच बिबट पाळायला दिले पाहिजे. त्यांच्या अनुभवावरून मग प्रत्येक आमदाराला दोन बिबट दत्तक द्यायला हवे असा टोला लगावला.