Vishwas Nangre Patil on women safety
नागपूर, पुढारी वृत्तसेवा : "गुन्हेगारी प्रमाणात राष्ट्रीय गुन्हे नोंदणी ब्यूरोच्या (एनसीआरबी) आकडेवारीनुसार राज्याचा १८ वा नंबर लागत असला, तरी मागील पाच वर्षांत ७,५३५ बलात्काराचे गुन्हे दाखल झाले आहेत. महिलांना स्वसंरक्षणासाठी एखाद्याचा जीव घेण्याचाही अधिकार नवीन भारतीय न्याय संहिता (बीएनएस) ने दिला आहे, असे स्पष्ट करत महिलेने स्व-रक्षणासाठी शस्त्र परवान्याची मागणी केली, तर तो देण्यास तयार आहे," असे मोठे विधान नागपूर पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी केले.
शारदेय नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर महापालिका स्थायी समितीच्या अध्यक्षा शिवानी दाणी यांच्या संकल्पनेतून चॅरवेती फाऊंडेशनतर्फे ‘आदिशक्ती आत्मसंस्कार’ शस्त्र प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात विश्वास नांगरे पाटील यांनी महिलांना मार्गदर्शन केले.
यावेळी महिलांना मार्गदर्शन करताना विश्वास नांगरे पाटील म्हणाले की, "पोलीस आयुक्त या नात्याने मला शस्त्र परवाने देण्याचा अधिकार आहे. मात्र, एकही महिलेने आजपर्यत स्व-रक्षणासाठी शस्त्र परवान्याची मागणी केलेले नाही."
गुन्हेगारी प्रमाणात एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार राज्याचा १८ वा नंबर लागत असला, तरी मागील पाच वर्षांत ७,५३५ बलात्काराचे गुन्हे दाखल झाले आहेत. मुलींना गर्भातच मारण्यापासून लग्नानंतरच्या हिंसाचारापर्यंत असे गुन्हे घडतात. आता बीएनएस कायद्यात स्व-रक्षणासाठी जीव घेण्याचा अधिकार आहे. नागपुरात निर्भया पथकाच्या माध्यमातून महिलांना टार्गेट करणाऱ्या गुन्हेगारांविरोधात आठ दिवसांत दोषारोपपत्र आणि दोन महिन्यांत शिक्षा होईल, अशा उपाययोजनाही करणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.