नागपूर; पुढारी वृत्तसेवा : भाजपच्या राजकारणाला सामान्य माणूस कंटाळला आहे. कालच्या सभेत उपस्थित केलेले महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचाराचे मुद्दे भाजपला झोंबले आहेत. जनतेचा कौल बघून भाजपचे लोकसभा उमेदवार नितीन गडकरी स्वतः घाबरले आहेत. त्यामुळे त्यांनी भाजयुमोच्या कार्यकर्त्यांना माझ्या घराजवळ भ्याड कृत्य करण्यासाठी पाठवले, अशा शब्दात माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तमेवार यांनी माध्यमांशी बोलताना नितीन गडकरी यांच्यावर टीका केली.
पुढे मुत्तमेवार म्हणाले, सर्व मतदार हे सुज्ञ असून त्यांनी भाजपचा आभासी विकास अनुभवला आहे. आता शहरातील जनतेने परिवर्तनाची हाक दिली आहे. त्यामुळे भाजप नेत्यांच्या पायाखालची वाळू घसरली आहे. म्हणूनच आचारसंहिता लागू असताना विना परवानगी मोठ्या संख्येत भाजपा युवा मोर्चाचे टोळके माझ्या घराजवळ पूर्वनियोजितपणे गोळा झाले. त्यांनी माझ्या विरोधात घोषणा देत पुतळा जाळला. यावरुन नितीन गडकरी किती घाबरले आहेत. हे दिसून येते, असेही ते म्हणाले.
दरम्यान,भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येत माझ्या घराजवळ विना पोलिस परवानगी गोळा झाले. सर्व सुरु असताना पोलिस बघ्याच्या भूमिकेत होते. कायदा सुव्यवस्था सांभाळणारे जर सत्ताधाऱ्यांपुढे नतमस्तक होत असतील तर याचा जाब विचारण्याचा अधिकार प्रत्येक नागरिकाला आहे. याविरोधात आपण तक्रार दिली असून यावर कारवाई झाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नसल्याचेही यावेळी मुत्तमेवार म्हणाले.