Nagpur property tax waiver
नागपूर : महाराष्ट्र सरकारसाठी संपूर्ण राज्य म्हणजे फक्त मुंबईच आहे का, असा संतप्त सवाल आज विधानसभेत उपस्थित करत काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे यांनी राज्य सरकारच्या दुजाभावाच्या धोरणावर जोरदार टीका केली. मुंबईच्या धर्तीवर नागपूर तसेच राज्यातील इतर सर्व महानगरपालिकांमध्ये 700 चौ.फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता करातून पूर्ण सूट देण्याची मागणी ठाकरे यांनी केली.
विधानसभेत आज ठाकरे यांनी सांगितले की, मुंबईमध्ये 2022 पासून 500 चौ.फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता करातून पूर्ण सूट देण्यात आली असून हा निर्णय तेथील नागरिकांसाठी मोठा दिलासा ठरला आहे. आता 700 चौ.फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता करमुक्त करण्याची प्रक्रिया सुरू आहे, म्हणजेच मुंबईकरांना आणखी मोठा दिलासा देण्याची तयारी सरकारकडून सुरू आहे. मात्र, याचवेळी नागपूरसह महाराष्ट्रातील इतर महानगरपालिकांकडे सरकारने पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचे त्यांनी स्पष्टपणे निदर्शनास आणून दिले.
ठाकरे यांनी पुढे सांगितले की, नागपूर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेने दिनांक 25 फेब्रुवारी 2022 रोजी 500 चौ.फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता करातून सूट देण्याचा ठराव एकमताने मंजूर करून शासनाकडे पाठविला होता. मात्र, अत्यंत दुर्दैवाची बाब म्हणजे मागील चार वर्षांपासून हा प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित असून नागपूरकरांना कोणताही दिलासा मिळालेला नाही. यामुळेच मुंबईप्रमाणेच नागपूर तसेच राज्यातील सर्व महानगरपालिकांमध्ये 700 चौ.फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता करातून पूर्ण सूट तातडीने लागू करण्याची मागणी केली.
नागपूर - पश्चिम नागपूरमधील दाभा व परिसरात गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणीसंग्रहालयातून बिबट्यांची सतत होत असलेली घुसखोरी हा अत्यंत गंभीर आणि भीतीदायक प्रश्न असल्याने गोरेवाडा प्राणीसंग्रहालयाची कंपाऊंड वॉल उंच करणार असल्याची माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी विधानसभेत दिली. आमदार विकास ठाकरे यांनी विधानसभेत हा मुद्दा उपस्थित केला.
ठाकरे यांनी पूर्व नागपूर व विमानतळ परिसरातही बिबट्यांचे वारंवार दर्शन होत असल्याचे अधोरेखित करत नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आणला. यावर नाईक यांनी सांगितले की, बिबट्या व वाघ त्यांच्या नैसर्गिक अधिवासातच राहतील यासाठी ठोस आणि प्रभावी कृती आराखडा तयार करण्यात आला आहे.