विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार  pudhari photo
नागपूर

'कुंभमेळ्यातही मलिदा गँगचा भ्रष्टाचार; जनतेचा हिशोब द्यावाच लागेल'

विजय वडेट्टीवारांची सरकारवर बोचरी टीका

पुढारी वृत्तसेवा

नागपूर : "भ्रष्टाचार आणि अमानुष वृक्षतोडीच्या माध्यमातून कुंभमेळ्यासारख्या अत्यंत पवित्र कार्याला बदनाम करणाऱ्या या 'ट्रिपल इंजिन मलिदा गँग'ला जनतेच्या पैशांचा हिशोब द्यावाच लागेल," अशा शब्दांत विधानसभेतील काँग्रेसचे गटनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर हल्लाबोल केला.

वडेट्टीवार यांनी नागपुरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना भाजप आणि राज्य सरकारवर गंभीर आरोप केले. ते म्हणाले की, "भ्रष्टाचार संपवण्याचे आश्वासन देऊन सत्तेवर आलेले हे 'बोके' आज स्वतःच भ्रष्टाचाराचे लोणी खाण्यात मग्न आहेत. सरकारचे हे काळे कारनामे जनतेच्या लक्षात येऊ नयेत, यासाठी भाजपकडून जाणीवपूर्वक समाजात धार्मिक वादाची ठिणगी टाकली जात आहे."

धर्माच्या नावाखाली कोट्यवधींची लूट विजय वडेट्टीवार पुढे म्हणाले की, "जे लोक धर्माच्या नावावर सत्तेत आले, तेच आता कुंभमेळ्यासारख्या पवित्र कार्यातही कोट्यवधींचा भ्रष्टाचार करत आहेत. हा पैसा महाराष्ट्रातील सामान्य करदात्या जनतेचा आहे. या भ्रष्टाचाराने कुंभमेळ्याच्या पावित्र्याला धक्का लागला असून, निसर्गाचीही अतोनात हानी करण्यात आली आहे."

भाजपच्या घोषणांवरून लगावला टोला भाजपच्या सध्याच्या राजकीय घोषणांचा समाचार घेताना ते म्हणाले की, "हिंदू खतरे में है...", "एक है तो सेफ है" किंवा "बटेंगे तो कटेंगे" यांसारखे हिंसक आणि प्रक्षोभक नारे भाजपला का द्यावे लागतात, याचे मूळ कारण आता जनतेसमोर आले आहे. स्वतःचा भ्रष्टाचार लपवण्यासाठीच अशा घोषणांचा आधार घेतला जात असल्याचा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT