विजय वडेट्टीवार  Pudhari Photo
नागपूर

Vijay Wadettiwar Statement | ही मदत म्हणजे उद्धवस्त शेतकऱ्यांची थट्टा!

विजय वडेट्टीवार यांचा आरोप

पुढारी वृत्तसेवा

नागपूर : महायुती सरकार हे शेतकऱ्यांची थट्टा करत आहे. मराठवाड्यात जानेवारी ते सप्टेंबरमध्ये ७८१ शेतकऱ्यांनी जीवन संपविले. अतिवृष्टीमध्ये गेल्या १५ दिवसात ७४ शेतकऱ्यांनी जीवन संपविले. अशा संकटात आज फक्त सरकारने मदतीचे आकडे फुगवून सांगितले. ही शेतकऱ्यांची थट्टा असल्याची टीका काँग्रेसचे गटनेते विजय वडेट्टीवार यांनी केली.

राज्यात शेतकऱ्यांची जमीन खरवडून निघाली आहे. त्यांची जनावरे वाहून गेली आहेत अशा वेळी शेतकऱ्यांना सरसकट ५० हजार रुपये हेक्टरी मदत करण्याची अपेक्षा होती. मात्र आज NDRF निकषानुसार दिलेली मदत ही तुटपुंजी आहे. याने शेतकरी उभा राहणार नाही तर उद्धवस्त होईल अशी टीका वडेट्टीवार यांनी केली.पंजाबसारखे राज्य केंद्राची मदत न घेता प्रति हेक्टरी ५० हजार पर्यंत मदत देऊ शकते मग महाराष्ट्रासारख्या समृद्ध राज्यात शेतकऱ्यांना ठोस मदत का दिली जात नाही? असा सवाल केला.

दिवाळीच्या आधी मदत मिळणार का?

शेतकऱ्यांबरोबर शेतमजूर देखील अडचणीत आला आहे, त्यांना दिवाळीपूर्वी काय मदत मिळणार, असा प्रश्न उपस्थित केला. राज्यातील विधानसभा निवडणुकीआधी महायुतीने शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली होती.आज शेतकऱ्यांना कर्जमाफीची अपेक्षा असताना त्याची घोषणा केली नाही. कर्जमाफी करणार करणार फक्त तारीख पे तारीख सरकार सांगत आहे पण नेमकी शेतकरी कर्जमाफी कधी देणार हे सरकार सांगत नाही अशी टीका विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली.

जरांगे यांचा बोलविता धनी कोण ?

मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील हे काहीही कारण नसताना लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर टीका करत आहेत. सर्व समाजाला त्यांच्या हक्काचे आरक्षण मिळावे म्हणून जातीनिहाय जनगणना करावी, तसेच आरक्षणाची ५० टक्क्याची मर्यादा हटवावी ही भूमिका देशात सर्वात आधी राहुल गांधी यांनी मांडली आहे. जरांगे पाटील त्यांना का टार्गेट करत आहे? जरांगे पाटील यांची लढाई सामान्य जनतेसाठी आहे की विरोधकांच्या विरोधात आहे? गेल्या काही दिवसातील जरांगे पाटील यांच्या विधानामुळे त्यांचा बोलवता धनी कोण आहे असा प्रश्न आता उपस्थित होत आहे अशी टीका वडेट्टीवार यांनी माध्यमांशी बोलताना केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT