नागपूर

Vijay Wadettiwar on BJP: ज्यांनी तुमची फसवणूक केली त्यांना गावबंदी कराच – विजय वडेट्टीवार

मोनिका क्षीरसागर

नागपूर; पुढारी वृत्तसेवा: मराठा समाज आंदोलन आज ज्या स्टेजवर आहे, त्याला कारणीभूत कोण आहे? हे मनोज जरांगे पाटलांच्या वक्तव्यावरून समजत आहे. आजवर तुम्हाला आरक्षण देता येत नव्हतं की, देता येत होतं? मग काय अडचणी होत्या? अडचणी कायमच्या दूर करून निर्णय घ्यायला पाहिजे होता. २०१३-१४ मध्ये कॉंग्रेसने देखील हीच आरक्षण देण्याची भूमिका मराठ्यांबाबत स्वीकारली. आता आमची विनंती आहे की, ज्यांनी तुमची फसवणूक केली त्यांना तुम्ही गावबंदी करा; अशी रोखठोक भूमिका विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज (दि.२७) बोलून दाखविली. तसेच मी मराठा समाजातील अनेक तरुणांना आवाहन करतो की, आरक्षण मागणीसाठी इतकं टोकाचे पाऊल उचलू नका असेही वडेट्टीवार म्हणाले. (Vijay Wadettiwar on BJP)

पूर्वी लुटारुंची टोळी म्हणणारे भाजपचे लोक आता लुटारुंच्या मांडीला मांडी लावून बसलेत. आता लुटारुंना माल वाटण्याशिवाय पर्याय नाही. ज्या कारखान्यांवर आरोप केले, त्याच कारखान्यांना सरकार मदत करत आहे. सत्तेसाठी कुठल्याही पातळीपर्यंत तुम्ही जाऊ शकता. हे यावरुन दिसतंय असा आरोप वडेट्टीवार यांनी भाजपवर केला आहे. दसरा मेळावा संपला आणि जाणाऱ्या रावणाने विचारले मला जाळता पण जाळणाऱ्यांपैकी राम कोण? याचं उत्तर एकनाथ शिंदे यांनी दिलं तर बरं होईल. ना सरकारमध्ये राम आहे. ना शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असताना राम दिसतोय, धर्मा धर्मात तेढ निर्माण करताना राम दिसत नाही. स्वतःला राम दाखवण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री करत असतील, तर महाराष्ट्रातील जनतेनं त्यांना कधीचेच रावण मानायला सुरुवात केली आहे असा टोला देखील विरोधी पक्षमनेते वडेट्टीवार यांनी लगावला. (Vijay Wadettiwar on BJP)

आरक्षणाची मुदत संपली आहे. तेलंगणाचे कारण देऊन आरक्षण लांबणीवर टाकण्याचा हा केंद्रसरकारचा डाव आहे. तुम्ही दिलेल्या मुदतीत आरक्षण द्यायला हवं होतं. जरांगे पाटील यांना काय शब्द दिला. तुम्ही दिलेला शब्द मुदतीत पाळायला हवा होता. सरकार पळवाट काढत आहे. दरम्यान, पंतप्रधान शरद पवार यांच्याबाबत जे बोलले. त्याचं उत्तर शरद पवार देतीलंच असेही त्यांनी स्पष्ट केले.

आज देशातील शेतीचं उत्पन्न वाढलं, हरित क्रांती ही काही केवळ नऊ वर्षांत झाली नाही. या देशातील कृषी क्षेत्राचा विकास,काँग्रेसने केला आहे. मुंबईतील हिरे व्यापार गुजरातला जाणे, हा प्रकार बुलेट ट्रेन पासून सुरुवात झाली आहे. देशाच्या आर्थिक राजधानीला खिळखिळी करण्याचा प्रयत्न आहे. १२ हजार कारागीर शिफ्ट होणार आहेत. हिरे व्यापार मुंबईची शान, मुंबईचा कणा होती. तो तोडण्याचं काम केंद्र सरकारने केले आहे असे देखील विजय वडेट्टीवार म्हणाले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT