Pune Land Deal Cancellation
नागपूर: मुळात या प्रकारचे हे घोटाळे थांबले पाहिजे. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मोठे मन केले. पुत्रप्रेम कमी केले म्हणून त्यांचे अभिनंदन, अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया काँग्रेसचे गटनेते विजय वडेट्टीवार यांनी पुण्यातील वादग्रस्त जमीन खरेदी करार रद्द झाल्याबाबत व्यक्त केली. दिग्विजय पाटीलवर कारवाई झाली तशी पार्थ पवार यांच्यावर कारवाई झाली पाहिजे! अशीही मागणी केली.
पुणे शहरात जमिनी लुटल्या जात आहे.आज हा करार रद्द केला. या करारामध्ये असलेल्या लोकांवर गुन्हा दाखल झाला. पण जो मूळ मालक आहे, तो देखील दोषी आहे, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे.
दरम्यान, पुण्यातील कोरेगाव पार्क येथील जमिनीची खरेदी प्रकरणी स्टॅम्प ड्यूटी माफ करण्यात आली. पुण्याचे पालकमंत्री असलेल्या अजित पवार यांना यातील काहीच माहित नव्हते? या जमीन घोटाळ्याप्रकरणी त्यांनी राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली होती.
एखादे प्रकरण अंगलट आले की उपमुख्यमंत्री अजित पवार हात झटकतात. आता तर पुण्यातील जमिनीचे प्रकरण आहे, त्यांच्या मुलाने व्यवहार केला आहे, प्रकरण वाढल्यावर माझा याच्याशी संबंध नाही, असे बोलून ते जबाबदारी झटकू शकत नाहीत. पुण्यातील जमीन घोटाळा प्रकरणी अमेडिया कंपनीने व्यवहार केला. या कंपनीत पार्थ पवार पार्टनर आहेत, त्यांच्या सह्या आहेत. मग गुन्हा फक्त दिग्विजय पाटीलवर का दाखल झाला? महायुती सरकार म्हणजे तू खा, मी ही खातो आणि एकमेकांना वाचवू,, असे संगनमताने काम सुरू आहे,अशी टीकाही त्यांनी केली होती.