चंद्रपूर : शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करताना काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी आपल्या राजकीय प्रवासातील जुन्या आठवणींना उजाळा दिला. बाळासाहेबांचे व्यक्तिमत्त्व, त्यांचे हिंदुत्व आणि राजकारणाकडे पाहण्याची दृष्टी आजच्या सत्ताधाऱ्यांपेक्षा वेगळी होती, असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी त्यांनी सध्याच्या राज्यातील महिला सुरक्षेच्या प्रश्नावरून सरकारवरही जोरदार टीका केली.
स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्याशी असलेल्या आठवणी सांगताना विजय वडेट्टीवार भावूक झाले. सुमारे पंचवीस वर्षांपूर्वी आपण शिवसेनेत कार्यरत असताना गडचिरोली जिल्ह्यात बाळासाहेबांच्या अनेक सभा घेतल्याचे त्यांनी सांगितले. “बाळासाहेब मला नावाने हाक मारायचे नाहीत. मला पाहिल्यावर ते ‘नक्षली आला’ अशी हाक मारायचे,” अशी आठवण त्यांनी यावेळी सांगितली. मात्र ही हाक टोमण्याची नसून आपुलकीची असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
वडेट्टीवार म्हणाले की, बाळासाहेबांचे हिंदुत्व कधीही बेगडी नव्हते. त्यांनी सत्तेसाठी किंवा राजकीय फायद्यासाठी हिंदुत्वाचा वापर केला नाही. जात–धर्माच्या चौकटीत न अडकता त्यांनी माणूस म्हणून माणसाकडे पाहिले. “आज मी राजकारणात आहे, त्यामागे बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि त्यांचा प्रभाव आहे,” असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले.
दरम्यान, बदलापूर येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर बोलताना विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. आरोपींना कायद्याचा कोणताही धाक राहिलेला नाही, अशी स्थिती असल्याचे त्यांनी सांगितले. बदलापूरमध्ये अशी घटना दुसऱ्यांदा घडणे हे गंभीर बाब असल्याचे नमूद करत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर बोट ठेवले.
“पूर्वीच्या घटनेत सहआरोपीला स्वीकृत सदस्य करण्यापर्यंत सत्ताधाऱ्यांची मजल गेली. जर आरोपींना संरक्षण दिले जात असेल, तर अत्याचार थांबणार कसे?” असा सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. आज राज्यात महिला आणि मुली सुरक्षित नसल्याची परिस्थिती निर्माण झाली असून, महाराष्ट्र महिला अत्याचाराचे हब बनत चालल्याची गंभीर टीका त्यांनी केली. महिला सुरक्षेच्या मुद्द्यावर सरकारने केवळ आश्वासने न देता ठोस कारवाई करावी, अन्यथा जनतेचा रोष वाढेल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.