नागपूर : शिवसेना मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी स्वबळाचे संकेत दिले. त्यानंतर पुन्हा एकदा राज्यात महाविकास आघाडीत बिघाडीची चर्चा सुरू झाली आहे. काँग्रेस मात्र अजूनही आघाडीच्या बाजूने असल्याचे सावध पवित्र्यात दिसत आहे. काँग्रेस ज्येष्ठ नेते वडेट्टीवार या संदर्भात माध्यमांशी बोलताना म्हणाले, महा आघाडी असावी आणि आघाडी टिकावी यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. स्वतः उद्धव ठाकरे यांनी अजून आपली भूमिका स्पष्ट केली नाही, त्यांच्या भूमिकेबाबत काँग्रेस हायकमांडशी चर्चा झालेली नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.
महायुती सरकार बेईमान आहे दिलेला शब्द फिरवित आहे या शब्दात वडेट्टीवार यांनी महायुती सरकारचा समाचार घेतला. लाडक्या बहिणींना अपात्र केले जात आहे तर दुसरीकडे शेतकरी कर्जमाफी वरून महायुती मधील मंत्र्यांमध्ये मतभेद असल्याचे वृत्त आहे. सरकार म्हणून ही सामूहिक जबाबदारी आहे. एसटी,रिक्षा,टॅक्सी भाववाढ करतील.चार वर्ष लोकांकडून पैसे घेतील आणि निवडणुका आल्या की एक हजार रुपये वाटून मत घेतील हेच या सरकारचे काम आहे अशी टीकाही वडेट्टीवार यांनी केली.
निवडणुका झाल्या मते मिळाली. आधी लाडक्या बहिणी योजनेतून महायुती सरकारने अपात्र केल्या आता शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसणार! असा आरोप विजय वडेट्टीवार यांनी शुक्रवारी (दि.24) माध्यमांशी बोलताना केला. वडेट्टीवार म्हणाले, शेतकरी कर्जमाफीसाठी दिलेले आश्वासन आता महायुती सरकारच्या मतभेदांच्या जाळ्यात अडकले आहे. निवडणुकीपूर्वी जी आश्वासने 'जाहीरनामा' म्हणून जनतेसमोर ठेवली गेली, ती सर्व मुळात मतदारांसाठी गाजरच होती हे आता उघड होत आहे. म्हणूनच आता अर्थमंत्र्यांच्या मते शेतकरी कर्जमाफी 'तिजोरीवरचा भार' ठरू शकते असे पुढे आले आहे. एकंदरीत आधी वचन देणे आणि नंतर निधीचे कारण देऊन ती पूर्ण न करणे हा जनतेचा विश्वासघात नाही का? शेतकऱ्यांच्या कष्टाचे आणि विश्वासाचे आदर करणारे हे सरकार नाही असा घणाघात त्यांनी केला