Maharashtra Day 2025
नागपूर : विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने आज महाराष्ट्र दिनाचा निषेध करण्यात आला. काळे कपडे घालून स्त्री-पुरुषांनी जोरदार घोषणाबाजी केली. अखेर पोलिसांनी अनेक विदर्भवादी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. 1 मे रोजी संविधान चौकात विदर्भाचा झेंडा फडकविणारच हा निर्धार विदर्भवाद्यांच्या वतीने करण्यात आला होता. सर्व कार्यकर्ते डोक्याला, बाजू दंडाला काळी फीत, काळे कपडे धारण करून पोहोचले होते.
1 मे 1960 पासून विदर्भाची अधोगती सुरूच आहे. विदर्भाचा बॅकलॉग वाढतच चालला आहे. आज राज्यावर 7 लाख 82 हजार कोटींचा कर्जाचा डोंगर असून, राज्याचा अर्थसंकल्प 45892 कोटी रुपये तुटीचा आहे. महाराष्ट्र राज्याचे महसूली उत्पन्न 5 लाख 60 हजार 963 कोटी असून, वर्षाचा खर्च भागविण्यास 6 लाख 6 हजार 855 कोटी लागणार आहे. म्हणून विदर्भातील गोसेखुर्दसह 131 सिंचन प्रकल्प पूर्ण होणे अशक्य आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्याचे सत्र सुरूच आहे. बेरोजगारांना नोकरी नाही. प्रदूषण, कुपोषण थांबणार नाही. वीज स्वस्त होणार नाही. नक्षलवाद संपणार नाही, यासाठीच विदर्भाचे स्वतंत्र राज्य झालंच पाहिजे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
पूर्व विदर्भ विभाग अध्यक्ष अरुण केदार, युवा आघाडी अध्यक्ष मुकेश मासुरकर, पूर्व विदर्भ उपाध्यक्ष सुनील चोखारे, जेष्ठ विदर्भवादी बाबा शेळके, अहमद कादर, नागपूर शहर अध्यक्ष नरेश निमजे, नागपूर जिल्हा अध्यक्ष प्रशांत नखाते, नागपूर शहर महिला अध्यक्ष ज्योती खांडेकर, गुलाबराव धांडे, गणेश शर्मा, गिरीश तितरमारे,अमूल साकुरे, राजेंद्र सतई, रवींद्र भामोडे, हरिभाऊ पानबुडे, लता अवजेकर, प्यारू भाई उर्फ नौशाद हुसैन, भरत बविस्टाले, नीलकंठ अंबोरे, माधुरी चौहान, किशोर कुर्वे, भोजराज सरोदे या आंदोलनात सहभागी झाले होते.
येत्या 25 मे रोजी अमरावती येथे पश्चिम विदर्भाचा निर्धार मेळावा अभियंता भवन शेगाव, अमरावती येथे होणार असून नागपूरच्या विदर्भ चंडिका शहीद चौक येथून 13 तारखेला अर्धनग्न पदयात्रा काढण्यात येणार आहे. अनेक गावी भेट देत ही पदयात्रा 25 तारखेला अमरावती येथे पोहचणार आहे.