नागपूरः गेल्या काही दिवसापासून नागपूर विदर्भात कडाक्याची थंडी पडत आहे. आज गुरुवारी नागपुरात या मोसमातील सर्वात कमी तापमान 9.8 अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. पूर्व विदर्भातील गोंदिया येथे राज्यात सर्वात कमी 9.4 अंश तापमानाची बुधवारी नोंद करण्यात आली.
गेल्या 72 तासात शहरातील तापमानात 9.2 अंशांनी घसरण होऊन किमान तापमान 10 अंशावर आले आहे. यापूर्वी 19.2 अंशावर असलेला पारा 10 ते 11 अंश सेल्सिअस दरम्यान खाली घसरल्याने ऊनी कपडे घालूनच बाहेर पडावे लागत आहे. रात्रीच्या वेळी ठिकठिकाणी शेकोटी पेटलेल्या पहावयास मिळत आहेत.
गेल्या आठवड्यात बंगालच्या उपसागररावर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला त्यामुळे मध्य भारतात ढगाळ वातावरण तयार झाले. पारा 19 अंशापर्यंत वर पोहोचला होता. थंडी बेपत्ता झाल्याने घरोघरी पंख्यांची घर घर देखील सुरू झाली होती. मात्र आता पुन्हा एकदा डिसेंबरची थंडी जोरात आहे. सोमवारपासून राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला नागपुरात सुरुवात होत आहे. कडाक्याच्या थंडीत केवळ आठवडाभराचे कामकाज वादळी ठरेल, राजकारण तापेल अशी शक्यता आहे.