नागपूर : केंद्रीय लोकसेवा आयोग नागरी सेवा परीक्षेत यावेळी नागपूरसह विदर्भातील विद्यार्थ्यांनी चांगले यश मिळवले आहे. 2024 च्या अंतिम निवड यादीत विदर्भातील एकंदर 12 विद्यार्थ्यांनी स्थान मिळविले आहे.
यात अव्वल असलेल्या जयकुमार आडे नागपूर या विद्यार्थ्यांचा 300 वा रँक आला असून श्रीरंग कावरे याचा 396, राहुल आत्राम या विद्यार्थ्यांचा 481 सर्वेश बावणे 503, सावी काळकुंडे 517, अपूर्वा बालपांडे 649, सौरभ येवले 669, नम्रता ठाकरे अशा नागपुरातील विद्यार्थ्यांचा अनुक्रमे 671 वा रँक आला आहे. दरम्यान, विदर्भातीलच गोंदिया येथील सचिन बिसेन या विद्यार्थ्यांचा 688, भाग्यश्री नायकाळे 737 तर धुळे येथील श्री गणेश पटेल या विद्यार्थ्यांचा 746 वा तर शिवांग तिवारी या अमरावती येथील विद्यार्थ्यांचा 752 वा रँक आलेला आहे. भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्र नागपूर जुने मॉरिस कॉलेज सिव्हिल लाईन्स येथील संचालक डॉ. प्रमोद लाखे यांनी नागपूर, विदर्भातील विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या दैदिप्यमान यशाबद्दल आनंद व्यक्त केला.
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) नागरी सेवा परीक्षेत यंदा विदर्भाचा टक्का वाढला असून नागपूर,विदर्भाच्या अनेक विद्यार्थ्यांनी अंतिम निवड यादीत बाजी मारली आहे. किमान 15 उमेदवारांनी ५००च्या आतील रँक मिळवली असून त्यांचे आयएएस, आयपीएस होण्याचे स्वप्न पूर्ण होण्याची शक्यता आहे. राज्य सरकारच्या भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्राच्या वतीने दिल्ली येथे मुलाखत पूर्व तयारी कार्यक्रमाचे मुख्य संयोजक डॉ. प्रमोद लाखे यांच्या नेतृत्वात या वैदर्भीय विद्यार्थ्यांनी तयारी केली.