नागपूर : एप्रिल 2024 ते मार्च 2025 या आर्थिक वर्षात विदर्भातील 11 हजार 102 ग्राहकांच्या वीज जोडण्यांची तपासणी केली असता 28 कोटी 44 लाख रुपयांची 3 हजार 470 वीज चोरी प्रकरणे उघड झाली आहेत.
महावितरणच्या सुरक्षा व अंमलबजावणी विभागाच्या अंतर्गत नागपूर प्रादेशिक विभागातील भरारी पथकांनी ही कारवाई केली. विदर्भातील या ग्राहकांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त, वीज चोरीची रक्कम न भरलेल्या 288 वीज ग्राहकांवर विविध ठाण्यामध्ये वीज चोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अकोला परिमंडलात सर्वाधिक 15 कोटी 81 लाख रुपयांच्या 1 हजार 24 वीज चोऱ्या, 6 अनियमितता आणि 472 इतर प्रकरणे उघडकीस आली. यापैकी 14 कोटी 40 लाख रुपयांची वसुली झाली असून 93 वीज चोरांवर गुन्हे दाखल करण्यात आले.
त्या खालोखाल नागपूर परिमंडलात 14 कोटी 14 लाख रुपयांच्या 815 वीज चोऱ्या, 41 अनियमितता आणि 261 इतर प्रकरणे उघडकीस आली. यापैकी 10 कोटी 5 लाख रुपयांची वसुली झाली असून 104 वीज चोरांवर गुन्हे दाखल करण्यात आले. तर अमरावती परिमंडलात 8 कोटी 77 लाख मूल्याच्या 675 वीज चोऱ्या, 7 अनियमितता आणि 505 इतर प्रकरणे उघडकीस आली. यापैकी 7 कोटी 77 लाख रुपये वसूल झाले असून 45 ग्राहकांवर वीज चोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले.
याशिवाय, चंद्रपूर परिमंडलात 4 कोटी 52 लाखांच्या 489 वीज चोऱ्या, 8 अनियमितता आणि 107 इतर प्रकरणे उघडकीस आली. यापैकी 4 कोटी 96 लाखांची वसुली झाली असून 18 ग्राहकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गोंदिया परिमंडलात 2 कोटी 97 लाखांच्या 467 वीज चोऱ्या, 6 अनियमितता व 165 इतर प्रकरणे उघडकीस आली. यापैकी 2 कोटी 68 लाख रुपये वसूल झाले असून 28 ग्राहकांविरोधात वीज चोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले. महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रा आणि कार्यकारी संचालक (सुरक्षा व अंमलबजावणी) अर्पणा गिते (म.पो.से.), प्रादेशिक संचालक, नागपूर परिक्षेत्र परेश भाग्वत यांच्या मार्गदर्शनाखाली उपसंचालक (सुरक्षा व अंमलबजावणी), नागपूर परिक्षेत्र सुनील थापेकर तसेच सुरक्षा व अंमलबजावणी विभागातील अभियंते, अधिकारी व कर्मचारी हे वीज चोरीमुळे होणारे आर्थिक नुकसान कमी करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.