नागपूर ते सिकंदराबाद 'वंदे भारत एक्सप्रेस' सोमवारपासून धावणार आहे.   File Photo
नागपूर

नागपूर ते सिकंदराबाद 'वंदे भारत एक्सप्रेस' सोमवारपासून धावणार

पुढारी वृत्तसेवा

नागपूर : पुढारी वृत्तसेवा : नागपूर ते सिकंदराबाद दरम्यान धावणार्‍या वंदे भारत एक्सप्रेसचे (Vande Bharat Express) नारंगी कोचेस नागपुरातील अजनी रेल्वेस्टेशनवर दाखल झाले आहेत. येत्या सोमवारी (दि. १६) दूरदृश्य प्रणालीद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हिरवी झेंडी दाखविणार आहेत. मध्यवर्ती रेल्वे स्थानकावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व इतर मान्यवर प्रामुख्याने उपस्थित राहतील. चेन्नई येथील कोच फॅक्टरीमधून नागपुरात नारंगी रंगाची १६ डब्यांची वंदे भारत एक्सप्रेस अजनी यार्डात दाखल झाली व तांत्रिक तपासणी झाली. सोमवारी ४ वाजता नागपूरहून ही गाडी दुरांतो प्लेटफॉर्मवरून अर्थात फलाट क्रमांक ८ वरून ती सुटणार आहे. यानिमित्ताने गेली अनेक वर्षे केली जाणारी मागणी पूर्ण होत आहे.

ही गाडी मंगळवार वगळता दररोज धावणार आहे.

ही (Vande Bharat Express) गाडी मंगळवार वगळता दररोज धावणार आहे. सध्या नागपूरला पोहोचण्यासाठी या प्रवासाला ८ तास लागतात. मात्र, वंदे भारत एक्स्प्रेसला ७ तास १५ मिनिटे लागतील. ही गाडी नागपूरहून पहाटे ५ ला निघेल आणि दुपारी १२.१५ ला सिकंदराबादला पोहोचेल. या गाडीला सेवाग्राम, चंद्रपूर, बल्लारशाह, रामगुंडम आणि काझीपेठ स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे. वंदे भारत एक्सप्रेस परतीच्या प्रवासात सिकंदराबादवरून दुपारी १ वाजता निघेल आणि नागपूरला रात्री ८.२० वाजता पोहोचेल. सध्या बिलासपूर ते नागपूर, तर नागपूर ते इंदूरदरम्यान दोन वंदे भारत एक्स्प्रेस धावत आहेत. दोन्ही वंदे भारत गाड्यांची देखभाल नागपूर विभागाकडे नसल्याने त्या चालवणारे लोको पायलट हे बिलासपूर आणि रतलाम विभागातील आहेत. नवीन ट्रेन आल्यामुळे नागपूरला सिकंदराबाद वंदे भारतचा मेंटेनन्स मिळू शकेल. लोको पायलटही नागपूर विभागातील असतील.

नागपूर -पुणे स्लीपरसाठी अजूनही प्रतीक्षाच

दरम्यान, नागपूर-सिकंदराबाद गाडी सुरू होण्याची चर्चा होताच नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसही सुरू करण्याची मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे. परंतु, नागपूर ते पुणे हे अंतर बघता चेअर कार वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करणे सोयीचे नसल्याचे सांगितले जाते. आता लवकरच या मार्गावर येत्या काळात स्लीपर क्लास वंदे भारत एक्स्प्रेस सुरू होण्याची शक्यता आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT