नागपूर : नागपुरातील कोराडी मार्गावरील उड्डाणपुलाखाली मंगळवारी एक कार आणि दोन एसटी बस अशा तीन वाहनांमध्ये विचित्र अपघातात झाला. यामध्ये ९ पेक्षा अधिक प्रवासी जखमी झाले. त्यांना मेडिकल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मंगळवारी सकाळी १०.४५ वाजताच्या दरम्यान गोंदिया आगाराची बस आणि त्यामागे रामटेक आगाराची बस सावनेरहून नागपूरच्या दिशेने येत होती. याचवेळी कोराडीतील उड्डाणपुलाखालून एक भरधाव कार जात होती. दुसरीकडे वळणातून एक सिमेंट मिक्सर ट्रक जात होता. दरम्यान, अचानक कारचा टायर फुटून ती विरुद्ध बाजूच्या एसटी बसच्या पुढे रस्त्यावर आडवी झाली. बस चालकाने जोरात ब्रेक दाबला तरीही बस कारवर धडकली. बसची गती कमी झाल्याने कारचालक थोडक्यात बचावला. दरम्यान धडकलेल्या बसच्या मागे असलेली रामटेक आगाराची दुसरी एसटी बस पुढच्या एसटीवर धडकली. या घटनेत मोठ्या संख्येने प्रवासी जखमी झाले.
परिसरातील नागरिकांनी जास्तच मार लागलेल्या सुमारे ९ जणांना मेडिकल रुग्णालयात नेले. घटनेची माहिती कळताच स्थानिक पोलिसांसह एसटीच्या अधिकाऱ्यांनीही घटनास्थळी धाव घेतली. या अपघातामुळे येथे काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. परंतु पोलिसांनी काही तासांत अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. जखमींवर मेडिकलच्या ट्रामा केअर सेंटरमधील तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीत सध्या उपचार सुरू आहेत. कारचालकाने त्याची चूक असल्याचे मान्य केले.