नागपूर : अवकाळी पावसामुळे नागपूर, विदर्भ आणि इतरत्र पिकांचे मोठे नुकसान झाल्याचे दिसत असून संबंधित यंत्रणांना तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानंतर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून भरपाई देण्यात येणार असल्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले. नागपूर विमानतळावर ते बोलत होते. दरम्यान, अशोक खरात जमीन प्रकरणाबाबत महत्त्वपूर्ण माहिती दिली.
खरात जमीन प्रकरणाबाबत बोलताना बावनकुळे म्हणाले की, पोलीस यंत्रणा योग्य पद्धतीने तपास करत असून प्राप्त होणाऱ्या माहितीच्या आधारे चौकशी सुरू आहे. अधिक माहिती समोर आल्यास तपासाला गती मिळेल.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रकरणात बारकाईने तपास करण्याच्या सूचना दिल्याचे त्यांनी सांगितले.
एसआयटीमार्फत या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून जमीन गैरव्यवहाराशी संबंधित माहिती महसूल विभागाकडे पाठवण्यात येत आहे. त्यामुळे स्वतंत्रपणे दुसरी चौकशी लावण्याची आवश्यकता नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. एसआयटीच्या अहवालावर आधारित पुढील कार्यवाही केली जाईल, असेही ते म्हणाले.
भूतकाळात शासनाच्या लाडकी बहीण योजनांचा गैरफायदा घेतला असल्यास संबंधितांना शोधून त्यांना पुढे लाभ मिळणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. दरम्यान, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी लिहिलेल्या पत्राबाबत आपल्याला कोणतीही माहिती नसल्याचेही बावनकुळे यांनी स्पष्ट केले.