नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत या, संघाला समजून घ्या, सेवा कार्यात सहभागी व्हा, जगाला अभय आणि शांती प्रदान करणारा भारत देशच आहे. भारताच्या पुनर्निर्माण प्रक्रियेची ही वेळ आहे. सामाजिक समरसता यामुळे संघ आज सर्वत्र परिचित असून जनतेचे प्रेमही मिळत असल्याचे प्रतिपादन सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांनी केले. भारताच्या सर्वांगीण उभारणीसाठी संघटित समाज, स्वावलंबन, चारित्र्यनिर्मिती आणि राष्ट्रीय एकात्मतेचे महत्त्व अधोरेखित केले.
भारताचा काळ उज्वल आहे. जगाला भारतच दिशा देऊ शकतो. अर्थ,काम,मोक्ष यासाठी पुरुषार्थ आवश्यक आणि यासाठी धर्म गरजेचा आहे. पुढील विजयादशमी पर्यंत संघ शताब्दीचे कार्यक्रम देशभरात चालणार आहेत. जगाच्या स्वार्थाच्या संघर्षात ज्यांचा काहीही संबंध नाही असे देश आज नाहक इंधन संकटात भरडले जात आहेत असा आरोप केला. जो शक्तिशाली असेल त्याचेच लोक ऐकतात. संघाला कुठलेही श्रेय नको, समाजाच्या संघटित शक्तीला ते श्रेय जावे यावर भर दिला.
स्वयंसेवक संघाच्या रेशीमबाग येथील डॉ. हेडगेवार स्मृती भवन परिसरात आयोजित ‘कार्यकर्ता विकास वर्ग – द्वितीय वर्ष’च्या समारोप सोहळ्यात ते बोलत होते. या कार्यक्रमास उद्योगपती कुमार मंगलम बिर्ला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. देशभरातून हजारावर स्वयंसेवक,प्रशिक्षक सहभागी झाले. मुख्य अतिथी आणि आदित्य बिर्ला समूहाचे अध्यक्ष कुमार मंगलम बिर्ला यांनी संघाच्या शिस्त आणि राष्ट्र उभारणीच्या कार्याचे कौतुक केले. देशाच्या आर्थिक प्रगतीसोबतच सामाजिक चेतना आणि मूल्यांची जोपासना करणे ही काळाची गरज असल्याचे नमूद केले.