नागपूर : हिवाळी अधिवेशनाकरिता नागपुरात दाखल झालेल्या उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या अनपेक्षित भेटीने राजकीय वर्तुळात वेगवेगळे तर्क लावले जात आहेत. मागील सरकारच्या काळातील कटाची सीडी अधिवेशन काळात समोर आली. हे सीडी प्रकरण पाहता आपले पुत्र आमदार आदित्य ठाकरे यांना सांभाळून घेण्याच्या आर्जवासाठी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. झालं गेलं विसरा, सांभाळून घ्या, असे आर्जव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना केले.
उद्धव ठाकरे सरकारच्या काळात देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना अडकवण्याचा प्रयत्न झाला होता. हा मुद्दा देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी अनेकवेळा मांडला होता. मात्र, राज्यात सत्तांतर झाले. महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतरच्या पहिल्याच अधिवेशनात या प्रकरणाची क्लिप विधिमंडळात सादर करण्यात आली. त्यावर मंत्री शंभूराज देसाई यांनी या संपूर्ण प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे पुढील काळात उद्धव ठाकरे यांच्या काळातील अशी अनेक प्रकरणे चव्हाट्यावर येणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. हे प्रकरण सभागृहात आले असताना उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीत विरोधी पक्षनेता नेमण्याइतके संख्याबळ नसले तरी विरोधी पक्षनेतेपद दिले जावे. यावर चर्चा झाल्याचे सांगण्यात येत असले तरी उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरेंना सांभाळून घेण्याच्या विनंतीसाठी ही भेट घेतल्याचे सांगितले जात आहे.
नितेश राणेंसह भाजपच्या काही नेत्यांनी दिशा सॅलियन प्रकरणावर भक्कम पुरावे असल्याचे दावे केले होते. तसेच इतर काही प्रकरणात आपल्याकडे पुरावे असल्याचे म्हटले होते. सभागृहात फडणवीस-शिंदे यांना अडकविण्याच्या कटाचे पुरावे बाहेर आले. त्याने माजी पोलिस आयुक्त संजय पांडे यांच्या अडचणी वाढणार आहेत. याचप्रमाणे इतर काही प्रकरणाच्या क्लिप बाहेर येण्याच्या चर्चा आहेत. या सर्व प्रकारात आदित्य ठाकरे यांना अडचणीत आणण्याचे प्रयत्न होऊ शकतात. म्हणून उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांच्याशी जुळवून घेण्याची भूमिका घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
जवळपास पाच वर्षे फडणवीसांना लक्ष्य करत ठाकरे गटाने चालविलेली टीका निवडणूक प्रचार काळात अगदी व्यक्तिगत पातळीवर पोहोचली होती. स्वतः उद्धव ठाकरे यांनी ‘एक तर तू राहशील किंवा मी’ अशी निर्वाणीची भाषा केली होती. त्यामुळे केवळ विरोधी पक्षनेतेपदासाठी ही भेट घेणे संभवत नसल्याचा दावा भाजपच्या गोटातून केला जात आहे.