Uday Samant | चित्रपट व नाट्यक्षेत्राला मिळणार उद्योगाचा दर्जा : उदय सामंत Pudhari Photo
नागपूर

Uday Samant | चित्रपट व नाट्यक्षेत्राला मिळणार उद्योगाचा दर्जा : उदय सामंत

100 व्‍या नाट्य संमेलनाचा समारोप, नटराज प्रतिमा रत्‍नागिरी शाखेला हस्तांतरीत

पुढारी वृत्तसेवा

Uday Samant

नागपूर : बॉलिवूड, मॉलीवूड, टॉलिवूड आणि मराठी नाट्यक्षेत्राला न्याय मिळवून देण्‍यासाठी व रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी उद्योगाचा दर्जा देण्‍यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍याकडून यासंदर्भात महाराष्ट्र दिनी घोषणा करण्‍यात येईल, अशी माहितीवजा घोषणा मराठी भाषा विभागाचे मंत्री आणि नाट्य परिषदेचे विश्वस्त उदय सामंत यांनी केली.

अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेच्या 100 व्या विभागीय नाट्यसंमेलनाच्या समारोप प्रसंगी सामंत बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर संमेलनाचे अध्यक्ष डॉ. जब्बार पटेल, मध्यवर्तीचे उपाध्यक्ष नरेश गडेकर, नागपूर शाखेचे अध्यक्ष अजय पाटील, संजय रहाटे यांच्यासह सर्व शाखांचे अध्यक्ष, पदाधिकारी उपस्थित होते.

मराठी भाषा केवळ दर्जा देऊन अभिजात ठरत नाही. नाट्यकर्मी, लेखक, दिग्दर्शक जे प्रयोग करतात ते अभिजातच असते. नाटके नव्या पिढीसाठी पुनर्जिवित करण्यात यावी, हा ठेवा जतन करावा, असे आवाहन सामंत यांनी केले.

त्याचप्रमाणे नाट्य व चित्रपटक्षेत्रातील कलावंत, तंत्रज्ञ यांना रोजगार व त्यांच्यासाठी कल्याणकारी उपक्रम राबविण्यासाठी नाट्यपरिषदेने पुढाकार घ्यावा, असेही आवाहन केले. आगामी काळात रंगभूमी गाजविणारे कलावंत आणि तंत्रज्ञ यांना प्रत्येकी पाच- पाच म्हणजे एकूण दहा घरे उपलब्ध करुन देण्याचा मानस शासनाचा असल्याचेही सांगितले.

यावेळी नाट्यसंमेलनाध्यक्ष डॉ. जब्बार पटेल यांनी, आपल्या अध्यक्षीय भाषणात संपूर्ण राज्यात छोटी नाट्यगृहे व संबंधित व्यवस्था यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्याचे काम नागपूर शाखेच्या पदाधिकार्‍यांनी हाती घ्यावे असे आवाहन केले.

ज्‍येष्‍ठ कलावंतांचा सत्‍कार

ज्येष्ठ रंगकर्मी मधू जोशी, प्रभाकर आंबोणे, श्रध्दा तेलंग, बापू चनाखेकर, शोभा जोगदेव, डॉ. रंजन दारव्हेकर, डॉ. विजय वैद्य, सुरेश घड्याळपाटील, प्रकाश एदलाबादकर, विजय जथे, संजय वलीवकर, वत्सला पोलकमवार, दयानंद चंदनवाले, मीना देशपांडे व सचिन कुंभारे या ज्‍येष्‍ठ कलावंतांचा उदय सामंत यांच्‍या हस्ते सत्कार करण्यात आला. पुढील संमेलनासाठी नाट्य प्रतिमा रत्नागिरी शाखेला देण्यात आली. यासोबतच स्व. गणेश नायडू स्मृती कला स्पर्धेतील विजेते वामन तुळसकर, रुक्मिणी दिक्षीत, तुषार राउत यांना पुरस्कृत करण्यात आले. सूत्रसंचालन अभिनेत्री भार्गवी चिरमुले यांनी तर आभार प्रदर्शन अजय पाटील यांनी केले.

मराठी नाटक समाजाचे दर्पण : नितीन गडकरी

मराठी नाट्य संस्कृती सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. मराठी नाटक समाजाचे दर्पण असल्याचे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अरुणाचल प्रदेश येथून दृकश्राव्य संदेशाद्वारे केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT