नागपूर : राज्यात फोडाफोडीचे राजकारण 1978 पासून सुरू होते. 2019 मध्ये उद्धव ठाकरे यांनी दगाफटका केला. म्हणून 2024 मध्ये स्थिर आणि मजबूत सरकार जनतेने दिले. महाविकास आघाडीने दगा फटका केला. त्याचे उत्तर जनतेने दिले. ज्यांनी जनतेसोबत बेईमानी केली त्या उद्धव ठाकरे, शरद पवार या सर्वांना जनतेने धडा शिकवला असे सांगत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांच्या विधानाचे समर्थन केले.
15 ते 16 जानेवारीपर्यंत पालकमंत्री पदाचा विषय सुटलेला असेल. मुख्यमंत्री अजितदादा, एकनाथ शिंदे, आमच्यात दोन-तीन बैठकी झाल्या आहेत. संजय राऊत दिवसभर वटवट करत असतात ते अजूनही पराभवाच्या मानसिकतेत आहेत. पुढच्या काळात त्यांना भविष्य नाही. रोज सामनातून टीका करण्यापेक्षा पक्ष वाढवावा.संजय राऊत यांनी रोज सकाळी विकासावर बोलावे असा सबुरीचा सल्ला दिला.
दरम्यान, वाल्मीक कराडवर मकोका संदर्भात अंजली दमानिया यांचे आरोप बाबत छेडले असता या प्रकरणात धनंजय मुंडे दोषी आढळतील त्या दिवशी सरकार कारवाई करेल. आज सरकारला तपासात मदत करावी. मुंडेवर कारवाई व्हावी असं कोणीच खाजगीत मला बोललेले नाही.14 जानेवारीला मी सुरेश धस यांच्याशी बोलून चर्चा करणार आहे.
इंडिया आघाडी अविचारी असल्यामुळे ती जास्त काळ टिकणार नाही. इंडिया आघाडीचे भविष्य संपले आहे. मोदी सरकार आले तर दुकानदाऱ्या बंद होईल यासाठी इंडिया आघाडी तयार झाली. इंडिया आघाडी हा राजकीय नेत्यांचा मुलांचा आखाडा होता. इंडिया आघाडीकडे विकसित देशासाठी धोरण नसल्यामुळे इंडिया आघाडी फुटली.महाराष्ट्रात सुद्धा उद्धव ठाकरे, काँग्रेस विरुद्ध शरद पवार अशा पद्धतीने चित्र दिसत आहे. कारण हे विचारातून एकत्र आले नाहीत असा आरोप केला.
याचवेळी लाडकी बहीण योजना सुरू राहील, कोणावर कारवाई होणार नाही नियमाच्या बाहेर कोणी घेतले असेल तर ते मात्र बंद होईल असेही सांगितले. भुजबळ यांची पतंग कापलेली नाही.छगन भुजबळ ज्येष्ठ नेते आहेत. प्रफुल पटेल, अजितदादा पवार या संदर्भात योग्य निर्णय घेतील असा विश्वास दिला.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजप तयार आहे. जेव्हा निवडणुका लागेल, तेव्हा पूर्ण ताकदीने मैदानात उतरू, कार्यकर्त्याच्या निवडणुकीत कार्यकर्त्यासोबत जाऊन काम करू, भारतीय जनता पार्टी नंबर एकचा पक्ष आहे. आम्ही महायुती म्हणूनच पुढे जाऊ असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.
शक्तिपीठ संदर्भात जे काही प्रश्न निर्माण झाले आहेत ते प्रश्न सोडून आम्ही पुढे जाऊ. शेतकऱ्यांचे काही प्रश्न असेल मनात शंका असेल, शेतकऱ्यांशी चर्चा केल्यावरच पुढे पाऊल टाकू शेतकरी समर्थन करेल त्या पद्धतीने आम्ही काम करू असेही त्यांनी सांगितले.