नागपूर : राजेंद्र उट्टलवार
सोमवारी राज्य विधिमंडळ हिवाळी अधिवेशन सुरू झाले. केवळ आठवडाभर असलेले अधिवेशन आमदारांच्या राजीनाराजीत विदर्भाला कितपत न्याय देणार हा प्रश्न कायम आहे. उपराजधानीत मंत्रिमंडळ विस्ताराच्या निमित्ताने रविवारी राजकीय वातावरण तापले. ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, सुधीर मुनगंटीवार, रवी राणा, नरेंद्र भोंडेकर, रणधीर सावरकर, संजय कुटे, कृष्णा खोपडे असे अनेक आमदारांचे समर्थक नाराज झाले आहेत. भुजबळ, शिवतारे असे अनेकजण नाराजीत नागपूर, अधिवेशन सोडून निघून गेले असल्याने राजकारण चांगलेच तापले आहे.
एकीकडे आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष, गटनेतेपदासाठी ग्रामीण काँग्रेस कमिटीत बैठक होत आहे, तर दुसरीकडे शिवसेना उबाठा गटाची आमदारांची बैठक, मार्गदर्शन उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत होत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे दिल्लीत आहेत. दुसरीकडे नागपूरचा पारा 8.2 अंश सेल्सिअस पर्यंत खाली घसरला असून तो कायम आहे.
कडाक्याची थंडी, बोचरे वारे वाहत असल्याने नागपूर गारठले आहे. गोंदिया जिल्ह्यात देखील 8.2 अंश तर वर्धा 9 अंशावर कायम आहे. विदर्भात इतरत्र 10 पर्यंत पारा असल्याने कडाक्याची थंडी आहे. गेले काही दिवस विदर्भात पारा सातत्याने 10 अंश सेल्सिअस खाली गेला आहे.